कल्याण : शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने शहरातील सिंगल ट्रान्सफॉर्मर व डबल ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चर उभारणीसाठी सुंदर मॉडेल तयार करुन महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या मुख्य विद्युत निरीक्षक यांचेकडे सादर केले होते. सदर मॉडेल उभारणीमुळे (शहरातील उपरित तारमार्ग वाहिनी स्वरुपात असलेले ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चर ऐवजी) शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याने असे ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चर उभारण्याचे महापालिकेच्या विचाराधीन आहे.
डोंबिवली (पश्चिम) सखाराम नगर येथे रस्ता रुंदीकरणात बाधित होत असलेले उपरित तारमार्ग वाहिनी स्वरुपात असलेले डबल ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चर काढून नविन भूमीगत सुंदर मॉडेल पध्दतीने ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चर उभारण्याचे काम पायलट प्रोजेक्ट स्वरुपात महापालिकेने पूर्ण केलेले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या नेतृत्वाखाली व शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली
सदर पायलट प्रोजेक्टची यशस्वी उभारणी करण्याच्या कामात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कल्याण येथील अधिक्षक अभियंता दिपक पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यावरील उपरित तारमार्ग वाहिनी स्वरुपात असलेले ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चरऐवजी शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे व नागरीकांसाठी सुरक्षित असलेल्या नविन मॉडेल पध्दतीने ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चर उभारण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल शासनास सादर करून नविन सुंदर मॉडेल पध्दतीचे ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चर उभारण्याचे काम हाती घेण्यात येईल अशी माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.