नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सातत्याने पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या किंमतीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जीडीपीत वाढ म्हणजे जी- गॅस, डी- डिझेल, पी- पेट्रोल यांच्या किंमतीत सातत्याने होणारी वाढ अशी टीका राहूल गांधी यांनी पंतप्रधान मोंदींवर केली आहे. गॅसच्या किंमतीत तब्बल ११६ टक्के वाढ झाली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याचे गांधी म्हणाले.


राहूल गांधी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, २०१४ साली सिलेंडरची किंमत ४१० रुपये होती. आज सिलेंडरची किंमत ८८५ रुपये म्हणजे गॅसच्या किंमतीत ११६ टक्के वाढ झाली आहे. पेट्रोल ७१.५ रुपये प्रति लीटर होते. आज पेट्रोलची किंमत १०१ रुपये आहे म्हणजे पेट्रोलच्या किंमतीत ४२ टक्के वाढ झाली आहे. डिझेल ५७ रुपये लिटर होते आज डिझेलच्या किंमतीत ५५ टक्के वाढ झाली आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जीडीपी वाढल्याचे सांगतात. तर जीडीपी म्हणजे जी- गॅस, डी- डिझेल, पी- पेट्रोल यांच्या किंमतीत सातत्याने होणारी वाढ आहे असा टोलाही राहूल गांधी यांनी लगावला. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. इंधन दरवाढीमुळे ट्रान्सपोर्टेशनच्या किंमतीत देखील वाढ झाली असून त्यामुळे महागाई वाढल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे असेही गांधी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!