ठाणे : फेरीवाल्यांच्या हल्ल्यात दोन बोट गमावलेल्या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्युपिटर रूग्णालयात जाऊन भेट घेतली. तुम्ही लवकर बरे व्हा, बाकी जबाबदारी आमची असे आश्वासन राज ठाकरे यांनी त्यांना दिलय. कालच माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी आरोपी फेरीवाला पोलिसांकडून सुटल्यानंतर आमच्याकडून मार खाईल अशा इशारा दिला होता. त्यामुळे आता अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचा खळखटयाळ पून्हा एकदा दिसून येणार आहे.
फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरु असताना एका फेरीवाल्यानं कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला केला. याच हल्ल्यात कल्पिता पिंपळे गंभीर जखमी झाल्या. एवढंच नाहीतर त्यांना आपल्या हाताची बोटं गमवावी लागली. कालच माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर आज राज ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली. भेटीनंतर राज ठाकरे म्हणाले की, मी फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो. लवकर बरं व्हा एवढंच सांगितलं आहे.” जे काही घडलं त्याचं निश्चितच दु:ख आहे. पण काळही सोकावतोय. अशा प्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांची कारवाई करतायत. न्यायालय देखील त्यांचं कर्तव्य बजावेल, अशी आमची पूर्ण अपेक्षा आणि आशा आहे असे ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरे देखील उपस्थित होते.
आम्ही धडा कसा शिकवणार हे सांगायला नको : अविनाश जाधव
ठाणे : राज ठाकरे यांनीही कल्पिता पिंपळे यांना आश्वासन दिलं आहे की, तुम्ही बरे व्हा बाकी जबाबदारी आमची. त्यामुळे पिंपळे यांच्याबद्दल घेतलेली जबाबदारी आम्ही पार पाडू. आम्ही धडा कसा शिकवणार हे कुणालाही सांगायची गरज नाही. अनेक लोकांना त्याचा अनुभव आहे. राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याला प्रसाद देऊ, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिलाय. आज एका महिला अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झालाय. उद्या अन्य अधिकाऱ्यांवर होईल. जिल्हाधिकाऱ्यांवरही असा हल्ला होईल. कायद्यानेही त्या फेरिवाल्याला सोडू नये. पोलिसांनी कडक शासन केलं पाहिजे असे जाधव यांनी सांगितलं.