ठाणे, दि. ३१ ऑगस्ट – ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्तांवर प्राणघातक हल्ला करणा-या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या त्या फेरिवाल्याविरोधात केवळ गुन्हा नोंद करुन चालणार नाही. तर या फेरिवाल्याच्या विरुध्द तात्काळ मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली. या मागणीसाठी आपण मुख्यमंत्र्यांनाही निवेदन देणार असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.

ठाण्यामध्ये कासारवडवली भागात अनधिकृत फेरिवाल्यावंर कारवाई करताना झालेल्या प्राणघातक हल्ल्यात ठाणे पालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज ज्युपिटर रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, पालिकेचे गटनेते मनोहर डुंबरे, नगरसेवक नारायण पवार, नगरसेवक भरत चव्हाण, ठाणे शहर महिला मोर्चा अध्यक्ष आणि नगरसेविका मृणाल पेंडसे, नगरसेविका नंदा पाटील, अर्चना मनेरा, स्नेहा आम्ब्रे, दीपा गावंड ,कमल चौधरी आदी उपस्थित होते.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा

त्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. एका महिला अधिकाऱ्यावर हल्ला करण्याची फेरिवाल्यांची हिम्मत कशी होते. ती मस्ती केवळ अनधिकृत काम करून त्यातून मिळालेल्या पैशाच्या माजातून निर्माण झाली आहे. राजकीय आशीर्वाद मिळाल्याशिवाय अशा प्रकारची हफ्तेबाजी होत नाही. त्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी संघटित गुन्हेगारी कायद्यातंर्गत कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

सुस्पष्ट फेरीवाला धोरण गरजेचे ..

देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना त्यांनी फेरीवाले धोरण आणले होते. परंतु या सरकारच्या काळात हे फेरिवाला धोरण अंतिम झालेले नाही. राज्यात धोरण नसल्यामुळे कोणतेही फेरीवाले कुठेही धंदा करण्यासाठी बसतात आणि त्यातून अशाप्रकारची गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होते. त्यामुळे राज्य सरकरने महापालिका, नगरपालिका अंतर्गत कडक उपाययोजना करत फेरिवाले धोरण आणण्याची मागणी दरेकर यांनी केली. ही घटना अत्यंत चीड आणणारी आणि चिंता व्यक्त करणारी आहे. या निमित्ताने जे अनधिकृत फेरीवाले आहे व फेरिवाल्यांमध्ये जे गुन्हेगारी प्रवृत्ती आहे त्यांचा प्रश्न या घटनेतून पुढे आला आहे. गरिब फेरीवाल्यांना संरक्षण दिले पाहिजे. पण जे फेरिवाले हफ्तेबाजी करुन अनधिकृतपणे धंदा करतात त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

घटनेला प्रशासन जबाबदार

दरेकर यांनी सांगितले की, हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या महिला अधिका-यांची प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्या तुटलेल्या बोटावर ऑपरेशन करून जुळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु अद्यापही त्यांच्या बोटांची स्थिति सांगता येणार नाही. ज्या धाडसी पद्धतीने त्यांनी हिम्मतीने लढा दिला ते नक्कीच कौतुकास्पद आहे. पण या प्रकाराला पालिका प्रशासन जबाबदार आहे. एक महिला अधिकारी अशी कारवाई करत असेल तर ना पुरेशी सुरक्षा व्यवस्था देण्याची गरज होती असेही त्यांनी स्पष्ट केले.

 पालकमंत्र्यांकडून कडक कारवाईचे आदेश

ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात त्यांची दोन बोटे तुटल्याने त्यावर सोमवारी तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल सात तास चाललेली ही शस्त्रक्रिया अखेरीस यशस्वी ठरली. त्यांच्यावरील उपचाराचा सर्व खर्च ठाणे महानगरपालिका करणार असून त्यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे यावेळी डॉक्टरांनी सांगितले.  ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही  रुग्णालयात जाऊन पिंपळे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिले आहेत जेणेकरून पुन्हा कुणाची असे कृत्य करण्याची हिम्मत होणार नाही.

पोलिसांकडून सुटेल तेव्हा आमच्याकडून मार खाईल : राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.  हल्ला करणारा आरोपी पोलिसांकडून जेव्हा सुटेल तेव्हा आमच्याकडून मार खाईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. अशा प्रकारे अधिकाऱ्यावर हल्ला करण्याची हिंमत कशी होते, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. जाहीर निषेध वगैरे करून ही सुधारणारी नाहीत. यांची  मस्ती ती उतरवली पाहिजे,  यांची सगळी बोट जेव्हा छाटली जातील आणि फेरिवाले म्हणून फिरता येणार नाही तेव्हा कळेल. असे राज ठाकरे म्हणाले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!