मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर पून्हा भूकंप झाला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावलयाने ठाकरे सरकारला हा दुसरा धक्का समजला जात आहे. अनिल परब हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे नोटीस परबांना, पण इशारा ठाकरेंना अशीच काहिशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून शाब्बास अशी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर टीका केली आहे. जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परिवहन मंत्री अनिल परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत, असे सांगत कृपया chronology समजून घ्या असे सांगत रत्नागिरीत नारायण राणे यांना अटक केल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचे सूचक विधान राऊत यांनी केले आहे. मात्र, कायदेशीर लढाई कायदयानेच लढू, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने १०० कोटीच्या कथित वसुलीसंदर्भात ही नोटीस बजावली आहे. ईडीने अनिल परब यांना मंगळवारी, ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजता ईडीच्या मुंबईच्या कार्यालयात हजार राहण्याची सूचना देण्यात आलेले आहे. यापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे आता परिवहन मंत्री अनिल परब यांना नोटीस बजावल्याने महाविकास आघाडी सरकारमधील हे दुसरे मंत्री ठरले आहेत.