दापोली : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे समजले जाणारे शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतील अलिशान बंगला जमिनदोस्त करण्यात आला. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या बंगल्याविषयी तक्रार केली होती. नार्वेकर यांच्या बंगल्यावर कारवाई झाल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मोठा दणका समजला जात आहे. नार्वेकर यांच्या बंगल्यावरील कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मिलिंद नार्वेकर यांच्या अलिशान बंगला होता. आज (रविवार) सकाळपासूनच नार्वेकर यांचा बेकायदा बंगला पाडण्याचे काम सुरू आहे. जेसीबीच्या साहययाने बंगला तोडण्याचे काम सुरू आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बंगल्याच्या कारवाईचा व्हिडीओ ट्विट केला आहे. उद्या (सोमवारी) दापोलीला जाऊन बंगल्याच्या तोडकामाची स्वत: पाहणी करणार असल्याचेही सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
कोण आहेत मिलिंद नार्वेकर …
मिलिंद नार्वेकर साधे शिवसैनिक होते. मालाडच्या लिबर्टी गार्डन भागातला गटप्रमुख. नव्या वॉर्डचं शाखाप्रमुखपद मिळेल या आशेने मातोश्रीवर पोहोचला. चुणचुणीत, हुशार, स्मार्ट, बोलण्यात पटाईत असा हा पंचविशीतला तरूण उद्धव ठाकरेंच्या नजरेत भरला. फक्त शाखाप्रमुख बनायचंय की आणखी काही जबाबदारी उचलायची तयारी आहे. असे उध्दव ठाकरेंनी विचारंताच, बोलण्यात पटाईत असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी पटकन उत्तर दिले, तुम्ही सांगाल ते. आणि त्यानंतर दोन वर्षात मिलिंद नार्वेकर उध्दव ठाकरेंचा पीए बनला. अपॉइण्टमेण्ट घेणं, डायरी ठेवणं, फोन घेणं, दौरे आखणं, व्यवस्था करणं अशी कामं ते करू लागले. अनेक नेत्यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. नारायण राणेंनी तर मिलिंदकडून आर्थिक व्यवहार होत असल्याचे आरोप केला होता. पण त्यांचे काहीच झाले नाही. मिलिंद नार्वेकर यांच्यामुळे मेाठा गहजब झाला, पण उद्धव ठाकरेंच्या दरबारी त्याचं स्थान बळकट होतं आणि आहे.
पुढचा नंबर अनिल परब यांचा …
मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीत मुरुड गावाच्या समुद्र किनाऱ्यावरील ७२ गुंठा जागा घेतली, त्यात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या भव्य दुमजली बंगल्याचे काम जोरात सुरू असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगलाची, झाडांची नासधूस केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तोडण्यात आल्यानंतर आता पुढचा नंबर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टचा असल्याचंही सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.