ठाणे : तलावाचे शहर म्हणून ठाण्याची ओळख असली तरी सुध्दा दुर्मिळ वृक्षही ठाण्यात मोठया प्रमाणात आहेत. दुर्मिळ उर्वशी वृक्षाबाबत महापालिका प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. रस्ता रूंदीकरणात अनेक दुर्मिळ डेरेदार वृक्ष बाधित होत आहेत त्यामुळे वृक्षाच्या संरक्षणासाठी पर्यावरण प्रेमी नेहमीच पालिका प्रशासनाविरोधात उभे ठाकले आहेत. स्वर्गलोकीच्या उर्वशीला ठाण्यात मरणयातना सहन कराव्या लागत असून, दुर्मिळ उर्वशी वृक्षाच्या संरक्षणासाठी ठाणेकर सरसावले आहेत. दुर्मिळ हेरिटेज वृक्षाच्या संरक्षणासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे ठाण्यातील खितपत पडलेल्या दुर्मिळ उर्वशीला नवसंजीवनी देण्यासाठी पर्यावरण मंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष द्यावे अशी विनंती पर्यावरण प्रेमींमधून व्यक्त होत आहे.
कोलशेत येथील क्लॅरीयंट बस थांब्याच्या पाठीमागील बाजूस दुर्मिळ असा एकमेव उर्वशी वृक्ष आहे. मात्र इथल्या दुर्मिळ वृक्षाबाबत ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभाग अनभिज्ञ असल्याचे दिसून येत असल्याचे पर्यावरण कार्यकत्यांचे म्हणणे आहे. क्लॅरीयंट बस थांबा ते नंदीबाबा चौक या रस्तारुंदीकरण कामात ४५० वृक्ष बाधित होत आहेत. यातील अनेक वृक्ष हे ५० वर्ष पेक्षा अधिक वयोमानाचे असून अलीकडेच यातील २५ पेक्षा जास्त वृक्ष तोडण्यात आले तेव्हा स्थानिक वृक्षप्रेमींमध्ये असंतोष उफाळला होता. यावेळी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत कोलशेत वृक्ष प्रेमी समूहाची स्थापना करीत वृक्षतोडीविरोधात जनजागृती पर अभियान सुरू केले होते. वृक्ष तज्ञ डॉक्टर मानसी जोशी यांनी या पट्ट्यात असणाऱ्या अमूल्यवान अशा उर्वशी वृक्षाबाबत स्थानिकांना माहिती देऊन मार्गदर्शन केले. मात्र डेरेदार हेरिटेज वृक्षांच्या बुंध्याशी बांधकाम राडारोडा फेकल्याचे पाहून वृक्षप्रेमी अस्वस्थ झाले होते.
ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांना पत्र लिहून वृक्षतोड थांबवावी व दुर्मिळ वृक्षांचे संवर्धन व्हावे अशी मागणी करीत नागरिकांनी आपला असंतोष व्यक्त केला होता. यावेळी उर्वशी वृक्षाच्या संरक्षणाची मागणी करण्यात आली मात्र ही मागणी करूनही महिना उलटला तरी ठामपा तर्फे येथील राडारोडा उचलण्याची कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.यंत्रांच्या मदतीशिवाय इथे फेकलेला बांधकाम राडारोडा उचलणे केवळ अशक्य असल्याने नागरिकांनी श्रमदान करून सभोवतालचा परिसर स्वच्छ करून उर्वशी वृक्षाचे गुदमरलेला श्वास मोकळा केला. या स्वच्छता अभियानात येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटी व म्युज चे कार्यकर्ते सामिल झाले होते. झाडांच्या मुळांशी ओल्या कचऱ्यापासून बनविलेले खत टाकण्यात आले व दगडी संरक्षक चौथरा बांधण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी टाकाऊ निसर्गपुरक वस्तूंपासून बनविलेल्या राख्या बांधून वृक्षबंधन साजरे करण्यात आले. नागरीकाना या महत्वाच्या वृक्षाबद्दल माहिती व्हावी यासाठी उर्वशी वृक्षाची शास्त्रीय माहिती देणारा फलक वृक्ष प्रेमींतर्फे झाडाजवळच लावण्यात आला आहे. या झाडाचा इतिहास तसेच त्याचे संवर्धन व्हावे या हेतूने जनजागृती पर मोठा फलक लावून ठाणेकरांना दुर्मिळ वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन कोलशेत वृक्षप्रेमी समूहातर्फे करण्यात आले आहे.
उर्वशीची माहिती …
उर्वशी उर्फ केशरी बहावा उर्फ स्वर्गातील वृक्ष हा मूळचा ब्रह्मदेशातील वृक्ष आहे. तिथे याला कवक आणि नथानी या नावानी ओळखतात. याचे शास्रीय नाव ऍमर्शिया नोबिलिस असे असून ब्रह्मदेशातील त्यावेळच्या राज्यपालांच्या पत्नी लेडी ऍमर्शिया यांचे नावावरून दिले गेलेले आहे. याच्या मोहकतेमुळे याला फुलांची राणी असेही संबोधतात. हा वृक्ष सदाहरित असुन याची पाने लालसर, नाजुक आणि लुसलुशीत असतात. या वृक्षाला झुंबरात फुले यतात. एका झुंबरात साधारणपणे पंधरा ते पंचविस फुले असतात. फुले फुलून गेल्यावर लालबुंद रंगाचा डाग असलेल्या पांढऱ्या व गुलाबी रंगांच्या शेंगा येतात. एक शेंग चार ते पाच इंच लांब असते व यात एकच चपटे वाटोळे बीज असते. झाडावर तडकून स्प्रिंगसारखी दिसणारी वळणारी ही शेंग तडकण्याआधीच उतरली तरच हे बीज हाती लागतं. नर्सरीमध्ये याचे पुनरुत्पादन करणे म्हणूनच कठीण आहे. ठाण्य व्यतिरिक्त मुंबईत व पुण्यात देखील एकमेव वृक्ष आढळतो.
पालक मंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी
दुर्मिळ हेरिटेज वृक्षांच्या संरक्षणासाठी अलीकडेच वृक्ष कायद्यात अमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. याबाबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वतःहून पुढाकार घेतला होता. ठाण्याच्या पालकमंत्र्यांकडेच राज्याचे नगरविकास खाते असल्याने त्यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालण्याची गरज आहे. कोलशेत भागात अनेक दुर्मिळ हेरिटेज वृक्ष आहेत. ते पाहण्याकरिता व अभ्यासाकरीता देश विदेशातील वृक्ष अभ्यासक याठिकाणी भेटी देत असतात. येथील कंपन्यांच्या आवारात पूर्वापार संरक्षित असणाऱ्या वृक्षांवर विकासाकामांमुळे सतत कुऱ्हाड चालविली जात आहे. यात कोणतेही तारतम्य बाळगले जात नसल्याने स्थानकांमध्ये प्रचंड रोष आहे तरी पालकमंत्र्यांनी स्वतःहून या प्रकरणी लक्ष घालावे व ठाणे महानगरपालिकेला दुर्मिळ हेरिटेज वृक्षांच्या संरक्षणासाठी निर्देश द्यावेत. — रोहित जोशी – पर्यावरण कार्यकर्ता
अनुभवी वृक्ष तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे*
ठाण्यातील वृक्षांचे संरक्षण व संवर्धन हे वृक्ष प्राधिकारणचे प्रथम कर्तव्य आहे. ठामपा आयुक्त हे वृक्ष प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. कोलशेत वृक्षप्रेमी नागरिकांनी आयुक्तांना उर्वशी वृक्षबाबत ईमेल द्वारा माहिती देऊनदेखील महिना उलटला तरी वृक्ष संवर्धनासाठी काहीही प्रयत्न ठामपा तर्फे केले गेले नाहीत ही संतापजनक बाब आहे.वृक्षतोडीच्या प्रस्तावांवर तातडीने निर्णय घेत बिल्डरांना लाल पायघड्या घालणारे वृक्ष प्राधिकरण हेरिटेज दुर्मिळ वृक्षांच्या संरक्षण व संवर्धनाबाबत अक्षम्य हेळसांड करते आहे. आपल्या अधिकारांबाबत जागृत असणाऱ्या वृक्ष प्राधिकरण सदस्यांना आपली प्राथमिक कर्तव्ये बजावता येत नसतील तर त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. ठाण्यातील अनुभवि व कर्तबगार वृक्ष तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे— कोलशेत वृक्ष प्रेमी समुह