अक्षयकुमारकडून शहीद पोलीसांच्या कुटुंबियांना २५ हजाराची दिवाळी भेट
मुंबई : अभिनेते अक्षयकुमार यांनी १०३ शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक कुटुंबाला २५ हजाराचा धनादेश व दिवाळीसाठी मिठाई दिली आहे. यापैकी ३९ धनादेशांचे वितरण कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या उपस्थितीत दोन शहीद पोलीसांच्या कुटुंबियांना घरी भेट देऊन प्रातिनिधिक स्वरुपात सुरुवात करण्यात आली.
कसबा बावडा येथील करवीर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या दिलीप संकपाळ यांचे कर्तव्यावर असतानाच ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या घरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन अक्षयकुमार यांनी पाठविलेला धनादेश त्यांच्या कुटुंबियांकडे सोपविला. तसेच त्यांच्या मुलांसाठी मिठाई देण्यात आली. अक्षयकुमारचे पत्रही यावेळी वाचून दाखवण्यात आले. यावेळी दिवंगत संकपाळ यांच्या पत्नी सुभद्रा संकपाळ, आई इंदुबाई संकपाळ, मुलगी श्वेता संकपाळ आदी उपस्थित होते. तसेच कसबा बावडा लाईन बाजार येथील सुरेश विठ्ठल जाधव यांचा कर्तव्यावर असताना अपघात झाला व त्यातच ह्दयविकाराने निधन झाले. त्यांच्याही घरी भेट देऊन पालकमंत्र्यांनी अक्षयकुमार यांच्याकडून आलेला धनादेश व मिठाई दिली आणि त्यांचे पत्रही वाचून दाखविले. यावेळी त्यांच्या पत्नी रुपाली जाधव, मुले स्नेहल व प्रतिक आणि आई हौसाबाई जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी स्नेहल जाधव यांच्याशी अक्षयकुमार यांनी स्वत: दूरध्वनीवरुन संवाद साधला. दोन्ही कुटुंबियांना यावेळी आपल्या भावना अनावर झाल्या होत्या.

अक्षयकुमारच्या पत्रातील भावना …
“ आपल्या घरातील शूर शहीद वीराने देशासाठी दिलेले बलिदान सर्वोच्च आहे. आम्हा सर्व भारतीयांना या सुपूत्राचा सार्थ अभिमान आहे. मला पूर्ण कल्पना आहे की या दिवाळीच्या प्रसंगी आपण त्यांचे सान्निध्य आणि प्रेमाच्या आठवणींना उजाळा देत असाल. आपल्यावर कोसळलेले दु:ख हे अपार आणि कठोर आहे. मात्र यातून आपण सावरुन धैर्य आणि संयमाने नवीन वर्षात पदार्पण करावे, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी या दिवाळीच्या प्रसंगी आपल्या घरातील बालकांसाठी मिठाई व त्यांच्या पुस्तकांसाठी छोटीशी भेट देऊ इच्छितो. आपण त्याचा प्रेमपूर्वक स्वीकार करावा, ही माझी नम्र विनंती” अशा भावना अक्षयकुमार यांनी पत्रात व्यक्त केल्या आहेत.

 

 

One thought on “अक्षयकुमारकडून शहीद पोलीसांच्या कुटुंबियांना २५ हजाराची दिवाळी भेट”
  1. अश्य कुमार खरंच खूप खूप ग्रेट काम करता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!