डोंबिवली ; कोरोनामुळे अनेकांना नोकरी, रोजगार गमवावा लागला आहे तर अनेकांच्या व्यवसायावर गंडांतर आले आहे त्यामुळे सर्वानाच आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच महावितरणकडून येणारी अव्वाची सव्वा वीज बिले, आणि ती बिले न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा सध्या महावितरणकडून सुरू आहे. एकीकडे महावितरणाच्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये नाराजीची भावना असतानाच, दुसरीकडे अवघे १३० रुपये वीज बिल भरले नाही म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन कापल्याचा प्रकार डोंबिवलीत घडलाय. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक दंम्पत्याला अंधारात राहावे लागले आहे. त्यामुळे ‘ मुख्यमंत्री साहेब, महावितरणच्या अधिकाऱ्यांना आवरा.. अशीच भावना सर्वसामान्य नागरिकांनामध्ये व्यक्त होत आहे.
डोंबिवली एमआयडीसीतील स्टर्लिग पॅलेस RH 3/1 या सोसायटीत राहणाऱ्या मोहन राव यांच्या घराचे १३० रुपये थकीत असल्याने वीज कनेक्शन कापल्याच्या अजब प्रकार घडला आहे. सध्या कोरोना मूळे राव दाम्पत्य बहुतेक वेळा आपल्या गावी असतात. अधून मधून ते आपल्या डोंबिवलीतील घरी काही दिवसासाठी येत असतात. जुलै महिन्यात ते गावी असल्याने 130 रुपये वीज बिल त्यांना भरता आले नाही. गेल्या वर्षापासून ते महावितरण कडे वीज बिलापोटी आगाऊ रक्कम भरीत होते .त्यामुळे त्यांचे बिल मायनस झीरो येत असे. परंतु यावेळी ते गावी असल्याने १३० रुपये बिल भरू शकले नाही. पण अवघ्या १३० रुपयासाठी वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. ऑगस्ट पहिल्या आठवड्यात जेव्हा डोंबिवलीतील आपल्या घरी आले तेव्हा घरातील दिवे लागत नसल्याने त्यांचे वीज जोडणी कापल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांचे वीज मीटरही महावितरणने घेऊन गेले होते.
याबाबत महावितरण, एमआयडीसी कार्यालयाशी त्यांनी संपर्क साधला असता त्यांना ऑगस्ट महिन्याचे व मागील महिन्याचे असे मिळून रू २४०/- बिल आणि रीकनेक्शन चार्जेस असे एकूण रू. ३५४/- असे भरा असे सांगण्यात आले. त्यांनी दिनांक १२ ऑगस्ट २०२१ रोजी ऑनलाईन द्वारे सदर बिल भरले असूनही आजपर्यंत त्यांची वीज जोडणी दिली नाही त्यामुळे त्यांना अंधारात राहावे लागत असल्याने हे दाम्पत्य पुन्हा गावी परतले आहेत. एका ज्येष्ठ नागरिक दापत्याना वीज कनेक्शन तोडल्याने मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. विशेष म्हणजे महावितरण कडून इथला वीज पुरवठा तासनतास खंडित होण्याचे प्रकार होत असून, त्यात सुधारणा करण्याऐवजी असे प्रामाणिकपणे वीज भरणाऱ्या ग्राहकांचे १३० रुपयासाठी वीज कनेक्शन तोडल्याने येथील नागरिकांत मोठा रोष निर्माण झाला आहे असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
—— –