ठाण्याच्या बाळकुम कोविड रुग्णालयाच्या डॉक्टर्स,नर्सची घेतली भेट
ठाणे, दि. १८ ऑगस्ट – ठाणे महापालिकेच्या बाळकुंम येथील कोविड रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, अन्य वैदयकीय कर्मचारी आदी सुमारे ५०० कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे. कोरोना संकट काळात ज्यांना देवदूत म्हणून उपमा देण्यात आली व कोविड योद्धे म्हणून ज्यांचा सन्मान करण्यात आला. त्याच कोविड योद्ध्यांना आज आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत असेल तर यापेक्षा त्यांचा अवमान असू शकत नाही. त्यामुळे रुग्णालयाच्या कर्मचा-यांना अचानक काढणा-या कंत्राटदारांची दंडेलशाही व मनमानी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.
ठाणे महापालिकेचे बाळकुंम येथे कोविड रुग्णालयातील सुमारे ५०० कामगाराना कामावरून कमी केले. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी आज कोविड रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले . अचानकपणे कामावरून कमी केल्याचा रोष या डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय आणि कामगारांमध्ये आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. ही माहिती मिळताच विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी तातडीने या आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. डॉक्टर व नर्स यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलताना दरेकर म्हणाले, संकटाच्या काळात या कोविड योद्ध्यांनी चांगल्या प्रकारची वैदयकीय सेवा दिली. फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम केले. ज्या डॉक्टर, कर्मचारी, नर्सच्या जिवावर हे हॉस्पिटल चालत आहे, आज त्यांची गरज संपली म्हणून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. ‘गरज सरो, वैद्य मरो’ ही म्हण आज रुग्णालय प्रशासनाने खरी करून दाखवली असल्याची टिकाही दरेकर यांनी केली. यावेळी आमदार निरंजन डावखरे, ठाणे महापालिकेचे गटनेते डुंबरे, नगरसेवक मिलिंद पाटणकर नगरसेवक संदिप लेले आदी उपस्थित होते. यावेळी रुग्णालयाचे डीन डॅा. माळगावकर, अतिरिक्त पालिका आयुक्त अशोक बोरपल्ले यांच्यासमवेत प्रविण दरेकर यांची बैठक झाली व रुग्णालयाच्या कर्मचा-यांच्या संबंधित विषयी चर्चा झाली.
एजन्सीची चौकशी करा ..
दरेकर यांनी सांगितले की, महापालिकेचे ग्लोबल कोविड हॉस्पिटल आहे की, सायबर कॅफे? या हॉस्पिटलशी संबंधित गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत. काही महिन्यांपूर्वी याच कोरोना रुग्णालयातील अतिदक्षता विभागांमध्ये दाखल करण्यासाठी प्रत्येक रुग्णामागे दीड लाख रुपये उकळण्याचे प्रकार उघड झाले होते. तसेच लसी उपलब्ध नसताना बनावट ओळखपत्राच्या आधारे अनेकांना लसी देण्यात आल्या. या महानगरपालिमध्ये रेमडिसेवीरचा काळाबाजारही झाला असून रुग्णांना वाढीव बिल दिल्याची अनेक प्रकरणेही समोर आली आहेत. त्यामुळे आज जी एजन्सी डॉक्टर व नर्स यांच्या जिवावर नफा कमवत आहे आणि त्यांनाच बाहेरचा रस्ता दाखवत आहे. त्यामुळे आता या एजन्सीची चौकशी करण्याची मागणी दरेकर यांनी केली.
कंत्राटदार ओम साई आरोग्य केअर प्रा. लिमिटेड एजन्सी बदलावी लागली तरी चालेल, पण येथील हॉस्पिटलच्या डॉक्टर्स व नर्सना काढता येणार नाही. जर या सर्वांच्या कामाचा बॉण्ड तीन महिने असेल तर तोपर्यंत तेथे त्यांना कायम ठेवा. अचानक येथील डॉक्टर्स व नर्स यांना काढता येणार नाही असे स्पष्ट करतानाच दरेकर यांनी सांगितले की, या विषयासंदर्भात उद्या संयुक्त बैठक घेण्यात येणार असून यावेळी सर्वपक्षीय आमदारांना निमंत्रित करुन या विषयी निर्णय घेण्यात यावा. या विषयी तात्काळ निर्णय घेण्यात आला नाही तर महापालिका चालवू देऊ नका, असे आवाहनही दरेकर यांनी केले.
कोणालाही कामावर काढू नका, अन्यथा आंदोलन करू
ठाण्याचे पालकमंत्री व नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती राहील की, या स्टाफमुळे जर ७ – ८ कोटीचा निधीचा अतिरिक्त भार प्रशासनाला होत असेल तर त्याची व्यवस्था करण्यात यावी. परंतु कोणालाही कामावरून काढू नका. यासाठी आंदोलनाची वेळ आली तरी भाजापच्यावतीने आंदोलन करण्यात येईल. येथील डॉक्टर्स व नर्स यांना न्याय मिळेपर्यंत पाठीशी भाजप ताकदीने उभे आहे, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.