केईएम रुग्णालयात साक्षी आणि प्रतीक्षा दाभेकर या बहिणींची भेट घेऊन दिली आर्थिक मदत 

मुंबई दि 12 : साक्षी आणि प्रतीक्षा या दाभेकर भगिनींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यासोबतच साक्षीला सर्वोत्कृष्ट कंपनीचा कृत्रिम पाय बसवून पुन्हा तिच्या पायावर उभी करू असे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आज मुंबईतील केइएम रुग्णालयात जाऊन त्यांनी दाभेकर कुटूंबाची भेट घेतली यावेळी डॉक्टरांशी बोलून त्यांनी साक्षीच्या तब्येतीची चौकशी केली.


रायगड जिल्ह्यातील पोलादपूर मधील केवनाळे या गावात घराची भिंत कोसळत असताना २ वर्षाच्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी १४ वर्षांच्या साक्षी दाभेकरने आपल्या जीवाची बाजी लावली. मात्र या दुर्घटनेत पायावर भिंत कोसळल्याने तिला तिचा डावा पाय उपचारादरम्यान गमवावा लागला. कबड्डी खो-खो यासारख्या खेळामध्ये प्रवीण असलेल्या साक्षीला पाय गमवावा लागल्याने मोठं नैराश्य आलं होतं. त्यासोबतच तिची बहीण प्रतीक्षा हिच्या पुढील शिक्षणाची देखील चिंता तिला सतावत होती. अखेर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारत असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज केईएम रुग्णालयात जाऊन शिंदे यांनी दाभेकर कुटूंबाला आधार दिला. साक्षी आणि तिची बहिण प्रतीक्षा यांची शैक्षणिक जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली असून त्यानी आपले शिक्षण पूर्ण करावे असे त्यांना सांगितले. तसेच या दोघींना तातडीचा दिलासा म्हणून आर्थिक मदतही देऊ केली.

साक्षीच्या पुढील उपचारांचा खर्च श्रीकांत शिंदे फाउंडेशन कडून करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय पायावर उपचार केल्यानंतर तिला जगातील सर्वोत्तम कृत्रिम पाय लावून स्वतःच्या पायावर उभे करू असेही त्यांनी स्पष्ट केले. साक्षीने दाखवलेल्या धाडसाची चर्चा मंत्रीमंडळाच्या बैठकीत देखील झाली होती. त्यावेळच तीच पालकत्व स्वीकारून तिच्या उपचाराचा संपुर्ण खर्च स्वीकारण्याची जबाबदारी शिवसेनेच्या वतीने शिंदे यांनी घेतली होती. 


दरडग्रस्त गावांचे पुनर्वसन वर्षभरात करणार 
महाडमधील दरडग्रस्त तळीये, पोलादपूर मधील केवनाळे, साखर, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर आणि हुम्बनाळे यासारख्या दरदग्रस्त गावांचे पुनर्वसन लवकरच सुरक्षित जागी करण्यात येईल.यासाठी सुरक्षित जागांचा शोध सुरू असून लवकरच या जागा निश्चित करून येत्या वर्षभरात त्यांचे पुनर्वसन नवीन जागी करण्यात येईल असे आश्वासन शिंदे यांनी यावेळी बोलताना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *