केडीएमसी लागली खड्डे बुजविण्याच्या  कामाला 

  आता महापौर स्वत: लक्ष ठेवणार 

कल्याण (प्रविण आंब्रे): गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावरील खड्डयांनी कल्याण-डोंबिवलीकर त्रस्त झाले असतानाच जागरूक  नागरिक आणि काही संघटनांनी या खड्ड्याविरोधात आक्रमक झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने अखेरीस रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी सुरुवात केली आहे.  पावसाच्या विश्रांतीनंतर केडीएसमी प्रशासनही कामाला लागले आहे. विशेष म्हणजे शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या देखरेखेखाली बुधवारी रात्रीपासून हे काम सुरू करण्यात आले.  रस्त्यांच्या कामावर महापौर  स्वत: लक्ष ठेवणार आहेत.

कल्याणची स्मार्ट सिटी योजनेसाठी निवड झाली आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून महापालिकेला आर्थिक मदत देखील मिळणार आहे. मात्र सध्या मात्र महापालिका क्षेत्रात अनेक विकास कामांच्या नावाने नागरीकांकडून ओरड केली जात आहे. अनेक कामे मोठ्या उत्साहात सुरु होतात मात्र त्यांचा प्रत्यक्षात लोकांना तितकासा फायदा होतोच असे नाही, अशी एकंदर परिस्थिती आहे. येथील कल्याण, डोंबिवली, आंबिवली व टिटवाळा परिसरातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याचे चित्र आहे. खड्ड्यांनी बहुतांशी रस्ते व्यापले आहे. पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करून घेण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सालाबादप्रमाणे गणेशोत्सवात खड्डे बुजविण्याचे काम का करावे लागते असा सवाल संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष अमित केरकर यांनी केला आहे. त्यांनी खड्ड्यांबाबत आंदोलन करण्याचा इशारा देखील महालिका आयुक्तांना दिला आहे. तर सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक प्रकाश पेणकर हे नेते असलेल्या रिक्षा संघटनेने देखील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित केल्याने शिवसेनेला घराचा आहेर मिळाल्याचे बोलले जात आहे.

महापालिका क्षेत्रातील रस्त्याच्या दर्जाकडे दुर्लक्ष करणारे महापालिकेचे अधिकारी आणि त्यांचे प्रमूख या नात्याने आयुक्तही त्यासाठी जबाबदार असल्याची भावना नागरिकांमध्ये बळावत आहे. दुसरीकडे प्रशासनाकडून काम करून घेण्याऐवजी एकमेकावर कुरघोडी करण्यात सत्ताधारी युतीमधील सेना-भाजप व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेतील रस्त्याच्या कामावरून शिवसेना खासदार आणि भाजप समर्थक आमदारांमध्ये श्रेय घेण्यासाठी चढाओढ रंगली होती. त्यातच नुकतेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी रस्त्यांच्या कामाचा पाहणी दौरा काढला असता चक्कीनाका येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड केले होते. नागरिकांमधून शहरातील रस्तांवरील खड्ड्यांविरोधात रोष वाढू लागला. दरम्यान, पावसाने काहीशी उघडीप घेतल्याने कल्याण शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरायला सुरुवात झाली आहे.

महापौरांचे लक्ष   
पावसामुळे हे खड्डे भरायला विलंब झाला असून येत्या दोन आठवड्यात महापालिका क्षेत्रातील सर्व खड्डे भरण्यात येतील. रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम येत्या शनिवारपासून कल्याण-डोंबिवली क्षेत्रात सर्वत्र युद्ध पातळीवर केले जाईल. जेणेकरून नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते मिळू शकतील. आपण प्राधान्याने या कामाकडे लक्ष ठेवून असल्याचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *