मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या पाच अक्षरी नावात मोठी ताकद होती. बाळासाहेबांच्या आवाजाचे तरंग उभ्या  महाराष्ट्रतच नव्हे तर देशभरात उमटत असत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांला त्यांनी नगरसेवक, महापौर, आमदार खासदार, मंत्री, मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचवले. बाळासाहेबांना जीवाला जीव देणारे अनेक निष्ठावंत सैनिक लाभले. डोंबिवलीतील सुभाष महाजन हे निष्ठावंतापैकीच एक नाव.  कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता १०- १५ नव्हे तर तब्बल ४० वर्षे ते शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. शिवसेनेशी त्यांची सामाजिक बांधिलकी नव्हे तर  रक्ताचं नात जोडलं आहे. स्टेट बँक कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळीत आहेत. शिवसेनेत पदाच्या लालसेपोटी अनेकजण आले आणि गेलेही.. मोठ मोठाली पदं भुषवली, पण तब्बल ४० वर्षे  एकनिष्ठ असलेल्या सुभाष महाजन यांच्यासारखे अनेक सैनिक शिवसेनेत आहेत.  राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला, सत्ता आली पण निष्ठावंत, सच्चा शिवसैनिक उपेक्षितच राहिल्याचा दिसून येत आहे. 


   
कपाळाला टीळा, अंगावर सफारी आणि चेह-यावर नेहमी हास्य, सर्वांनाच मदतीसाठी धावून जाणारा कार्यकर्ता असं हे सुभाष  महाजन यांचं व्यक्तीमत्व. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन १९७९ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हे ब्रीद उराशी बाळगून महाजन हे गेली ४० वर्षे सातत्याने काम करीत आहेत. शिवसेनेचे कोणतंही पद  नसतानाही केवळ शिवसैनिक म्हणून त्यांनी अनेकांची कामे केली आणि अजूनही करीत आहेत. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे सलाेख्याचे संबध, बाळासाहेबांशी त्यांचे थेट संबध होते. त्यांच्या कार्याचा गौरव खुद्द बाळासाहेबांनी अनेकवेळा भाषणातून केला. पण त्यांनी स्वत:साठी कधीच पदाची मागणी केली नाही. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेेचे व्रत कायम ठेवले. सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारीता, कला, क्रिडा सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या चौफेर कामाची चुणूक दाखवली. डझनभर संस्थेच्या माध्यमातून ते काम करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत विविध संस्थांकडून, शासनाकडूनही त्यांचा गौरव करण्यात आला आहे. 
 
डोंबिवलीकर रहिवाशी असलेले ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते सुभाष महाजन हे स्टेट बँक कर्मचारी सेनेचे अध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वीच बँकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत, त्यामुळे आता पूर्णवेळ शिवसेनेसाठी त्यांनी तनमनाने झोकून दिले आहे.  महाजन हे सर्व क्षेत्राशी संलग्न असल्याने त्यांचा गाढा अभ्यास आहे.  महाजन हे अनेक वर्षापासून राज्यपाल कोटयातील आमदारकीसाठी इच्छूक आहेत. पण त्यांना संधी मिळू शकली नाही.  राज्यपालांकडून कला, साहित्य, विज्ञान, सामाजिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान  देणा-या सदस्यांची निवड विधानपरिषदेत आमदार म्हणून केली जाते. त्यामुळे विधान परिषदेवर महाजन यांच्यासारखे अभ्यासू व्यक्तीमत्वाची निवड व्हावी अशी मागणी वजा अपेक्षा विविध सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधींकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.  

शिवसेनेत पदाच्या लालसेपोटी अनेकजण पक्षात आले मोठ मोठाली पदे भूषवून पक्षातून निघूनही गेले. दुस-या पक्षातून आलेल्यांना लगेचच आमदार, खासदारकी मिळाल्याचे चित्र नेहमीच दिसून येते, पण महाजनासारखे गेली ४० वर्षे शिवसैनिक म्हणून काम करणारे बाळासाहेबांचे निष्ठावंत, सच्चे शिवसैनिक मात्र पदापासून उपेक्षितच राहिले आहेत. त्यामुळे इतकी वर्षे  एकनिष्ठतेने कोणतेही पद न मिळताही शिवसेना पक्षाशी प्रामाणिक असणारे सुभाष महाजन यांच्या नावाचा राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी आता तरी शिवसेनेचे वरिष्ठ मंडळी विचार करतील का ? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले, उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. पण सुभाष महाजन आणि त्यांच्या सारख्या निष्ठावंत शिवसैनिकांना आता तरी न्याय मिळेल का ?  हाच खरा प्रश्न आहे.  

  • संतोष गायकवाड, डोंबिवली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!