एसटी कर्मचा-यांच्या संपावर उध्दव ठाकरे गप्प का ?
मुंबई : एसटी कर्मचारी संपाचा आजचा तिसरा दिवस. गेल्या तीन दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर असल्याने प्रवासांचे खूपच हाल होत आहेत. मात्र सरकारविरोधातील प्रत्येक आंदोलनाविषयी बोलणारे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे गप्प का आहेत असा सवाल महाराष्ट्राच्या जनतेला पडलाय.
सातवा वेतन आयेाग मिळावा या मागणीसाठी एसटी कर्मचा- यांनी संपाचे निशान फडकवलं आहे. एसटी कर्मचा- यांच्या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. त्यामुळे प्रवाशांचे खूपच हाल होत आहे. त्यात खाजगी वाहन चालकांचे चांगलेच फावलं आहे. सणासुदीनिमित्त बाहेर पडणा-या प्रवाशाला खूपच त्रास सहन करावा लागत आहे. ऐन दिवाळीत सणामध्ये संप पुकारू नये असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते मात्र मुख्यमंत्रयाच्या आवाहनालाही कर्मचारी संघटनेने केराची टोपली दाखवली. एसटी कर्मचा- यांचा संप सुरू असतानाच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी २५ वर्ष एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही, त्यासाठी महामंडळाकडे पैसाच नाही या वक्तव्यामुळे कर्मचा- यांमध्ये संतापाची आणखीनच लाट उसळली आहे. परिवहन मंत्री आणि कर्मचारी संघटनेची बैठकही पार पडली मात्र कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात अहमदनगर जिल्ह्यातील वाहक एकनाथ वाकचौरे यांचा मृत्यू झालाय.
शेतक-यांच्या कर्जमाफीचे आंदोलन असो वा अंगणवाडी सेविकांचे आंदोलन शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यात हिरीरीने सहभाग घेतला व त्यांच्या हक्कासाठी सरकारकडे बाजू मांडली. पण एसटी कर्मचा- यांचे आंदोलन तीन दिवसांपासून सुरू असतानाही उध्दव ठाकरेंनी याबाबत एक शब्दही काढलेला नाही. सरकारच्या विरोधातील आंदोलनात सहभाग घेणारे उध्दव ठाकरे आता गप्प का ? असा सवाल उपस्थित केला जात आहेत. परिवहन खातं हे शिवसेनेकडे आहे. त्यामुळे उध्दव ठाकरेंनी याकडं कानाडोळा केलाय का, असच यानिमित्त बोललं जात आहे.