कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
कल्याण : पावसाळ्यामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि रस्त्यांच्या दुरावस्थेतून कल्याण-डोंबिवलीकरांची लवकरच सुटका होणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे एमएमआरडीएने तब्बल ३६०.६४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याआधी देखील, डोंबिवली एम.आय.डी.सी. निवासी विभागातील रस्त्याच्या कामासाठीही एकूण ११०.३० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी ” सिटीझन न्यूज मराठी ” ने हा समस्याला वाचा फोडली होती तर आमदार रविंद्र चव्हाण यांनीही प्रशासनाला धारेवर धरले होते.
कल्याण-डोंबिवली महापालिकेची आर्थिक अवस्था बिकट असल्यामुळे रस्ते विकासासाठी एमएमआरडीएने निधी द्यावा, यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने पाठपुरावा करत होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे, एमएमआरडीएचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव, विद्यमान आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्या स्तरावर वारंवार बैठका घेतल्यानंतर खा. डॉ. शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. यामध्ये प्रामुख्याने ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौकापर्यंत उन्नत मार्ग बांधणे व १५ मी रस्ता विकसित करणेकरिता (उड्डाणपूल) २०.०० कोटी, डोंबिवली पूर्व मानपाडा रस्ता (स्टार कॉलनी) ते समर्थ चौक रस्ता काँक्रिटीकरणासाठी ३४.५६ कोटी, आडिवली मलंगगड रोड ते आडिवली तलावापर्यंतच्या रस्त्यासाठी २१.३७ कोटी, कल्याण पूर्व (मलंगगड रोड – आरटीओ ऑफिस) ते म्हसोबा चौक ते माणेरे कमान रस्त्यासाठी १०.०० कोटी, व्हीनस चौक ते एस.एस.टी. कॉलेज – मोरयानागरी ते नागकन्या मंदिर – विटीसी ग्राउंड ते श्रीराम चौक पर्यंत व अंतर्गत रस्ते सी.सी. करण्यासाठी १७.००, शीळ रस्ता ते संदप-उसरघर रस्ता काँक्रिटीकरणासाठी १६.५६ कोटी, डोंबिवली पूर्व गजानन चौक ते (नांदिवली) नालापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणासाठी १४.४० कोटी, आणि शहरातील अन्य रस्त्यांसाठी म्हणजेच डोंबिवली विधानसभा क्षेत्राकरिता ८७.१३ कोटी, कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांकरिता १११.९३ कोटी, कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांकरिता १२३.५९ कोटी, त्याचबरोबर कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांकरिता ३७.९६ कोटी असा एकूण तब्बल ३६०.६४ कोटी रुपयांचा निधी एमएमआरडीएने खा. डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर केला आहे. एमएमआरडीएच्या या निधीमुळे अनेक रस्त्यांची दुरुस्ती, अस्तित्वातील डीपी रस्त्यांचा विकास, दुपदरीकरणाच्या कामाला वेग येणार आहे. सदर विकासकामे एमएमआरडीए प्रशासन स्वतः करणार असल्याचेही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे या शहरातील वाहतूक अधिक वेगवान होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. खा. डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आणि एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांचे आभार मानले आहेत.