मुंबई, दि.१ : – स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,असं म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांनी क्रांतीची मशाल पेटवली. पण आज या स्वराज्यामध्ये सर्वसामान्य जनतेला त्यांचे हक्काचे घर देण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले असून त्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री .ठाकरे म्हणाले, बीडीडी चाळींचा एक मोठा इतिहास आहे. या चाळींनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, महाराष्ट्रासाठी रस्त्यावर सांडलेले रक्त पाहिलं. वासुदेव बळवंत फडके यांसारखे क्रांतिकारक देखील या चाळींमधील राहिले. बटाट्याची चाळ या पुस्तकातून पु. ल. देशपांडे यांनी चाळीच्या जीवनाचे सुंदर वर्णनच केलं आहे. अनेक क्रांतिकारी चळवळी तसेच आणि मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचा व त्यातील कष्टकऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्या लोकांचे फार मोठे योगदान मुंबईच्या विकासात राहिले आहे .आपण कितीही मजली इमारती आणि टॉवर्स या ठिकाणी बांधले तरी या चाळींच्या ऋणातून आपण मुक्त होणार नाही.

चाळीतील संस्कृती, मराठीपण जपून ठेवा

संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांपैकी अनेकांचे वास्तव्य या मुंबईच्या चाळींमध्ये होते. या हुतात्म्यांची आपण नेहमी आठवण ठेवली पाहिजे. उद्या चाळीतून तुम्ही टॉवरमध्ये जरी गेलात तरी आपली संस्कृती तुटू देऊ नका, अख्खे आयुष्य आपण याठिकाणी जगला आहात, हे घर तुमचे स्वतःचे आहे, त्यामुळे कोणत्याही मोहात पडू नका आणि मराठी पाळंमुळांना धक्का लावू देऊ नका, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.येथील ज्या जांबोरी मैदानाने क्रांतीच्या ठिणग्याना जन्माला घातले आहे, त्या ठिकाणीच आज हा रोमहर्षक असा क्षण घडतोय, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ग्रामीण भागात ५ लाख घरे

गेल्या काही महिन्यात सुमारे पाच लाख घरं आपण ग्रामीण भागामध्ये ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून बांधली, गिरणी कामगारांना देखील घर देण्यास सुरुवात केली असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. माझे दोन्ही आजोळ हे चाळीतच राहिले, मी त्यांच्याकडे लहानपणापासून जायचो, त्यामुळे चाळीतले जीवन मला माहिती आहे अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी चे अध्यक्ष खासदार शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड,अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक,वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, , पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी पाटील पाटील,  मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपथित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!