धुक्याच्या दुलईत रंगली दिवाळी पहाट!
खासदार कपिल पाटील यांच्यातर्फे कल्याणमध्ये आयोजन
कल्याण ( आकाश गायकवाड) : दाट धुक्याची दुलई, मराठी चित्रपट व गीतांच्या विश्वातील दिग्गजांची मांदियाळी, काहीशी बोचणारी थंडी अशा प्रसन्न वातावरणात कल्याणमधील खडकपाडा अर्थात `नवकल्याण’मध्ये आज पहाटे दिवाळी पहाट रंगली. सकाळी सहा वाजता सुरू झालेला कार्यक्रम साडेतीन तासांपर्यंत उत्तरोत्तर रंगत गेला. अन्, दरवर्षी अशीच पहाट रंगावी, अशी अपेक्षा करीत गाणी गुणगुणतच… रसिक घरी परतले.
भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्याकडून खडकपाडा येथील साई चौकात आज दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मराठी गीतांच्या सृष्टीतील मांदियाळी निमंत्रित करण्यात आली होती. अभिनेत्री भाग्यश्री चिरमुले, श्रुती मराठे, गायक स्वप्नील बांदोडकर, मिलिंद इंगळे, गायिका बेला शेंडे, केतकी माटेगावकर, चला हवा येऊ द्या.. तील भारत गणेशपुरे व श्रेया बुगडे यांच्या उपस्थितीत मराठी-हिंदी गीते, लावणी नृत्य, विनोदी किस्से आदींची मेजवानी रसिकांना पाहावयास मिळाली.
राधा ही भावरी… मन उधाण वाऱ्याचे… कोमल काया… गारवा.. अशा गीतांबरोबरच वाजले की बारा…च्या ठेक्यावर लावणी नृ्त्य बहरत गेले. केतकी माटेगावकरच्या संस्कृत गीताने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. मिलिंद इंगळेने सादर केलेल्या किशोरकुमार यांच्या रिमझिम गिरे सावन…गीताने जुनी पिढी हरवून गेली. तर नव्या पिढीने स्वप्नील व केतकीने सादर केलेल्या मला वेड लागले प्रेमाचे… या गीतावर ठेका धरला. श्रुती मराठेने सादर केलेले पिंगा.. आबालवृद्धांच्या पसंतीला उतरले.
दिवाळी पहाट कार्यक्रमाला खासदार कपिल पाटील यांच्याबरोबरच आमदार गणपत गायकवाड, आमदार नरेंद्र पवार, महापौर राजेंद्र देवळेकर, उल्हासनगरच्या महापौर मीना आयलानी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कल्याण जिल्ह्याचे संघचालक डॉ. विवेक मोडक, कल्याण पश्चिमचे संघचालक उमेश कुलकर्णी यांच्यासह राजकीय, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती. नवीन कल्याणमध्ये झालेला दिवाळी पहाट हा पहिलाच मोठा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमात बड्या कलाकारांची उपस्थिती असली, तरी पुढील वर्षी कल्याणमधील स्थानिक कलाकारांनीही कला सादर करावी, अशी अपेक्षा खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली.अखेर तब्बल साडेतीन तास रंगलेल्या कार्यक्रमाचा राष्ट्रगीताने समारोप झाला. अन्, कार्यक्रमाची आठवण व मनातल्या मनात गाणी गुणगुणत रसिक घरी परतले.
चवळी-कारंदेचा , पारंपरिक फराळ
खासदार कपिल पाटील यांनी दिवाळी पहाट निमित्ताने रसिकांना पारंपरिक पद्धतीच्या दिवाळी फराळाची भेट दिली. चवळे, कारंदे, अळू, रताळे, भुईमुगाच्या शेंगा असा फराळ रसिकांना दिला गेला. विशेषतः नव्या पिढीने अनोख्या फराळाला पसंती दिली.