नवी दिल्ली दि.29 – केंद्र सरकार कडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आम्हाला कोणावरही पाळत ठेवण्याची गरज नाही. फोन टॅपिंग ची गरज नाही. पेगॅसिस बाबत चा केंद्र सरकार वरील आरोप बिनबुडाचा आहे. केंद्र सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र विरोधक चर्चा न करता संसदेत गोंधळ घालत आहेत. त्यामुळे सलग तीन दिवस गोंधळ घातल्यानंतर चौथ्या दिवशी ही जो संसद सदस्य आपली जागा सोडून मर्यादेबाहेर वर्तन करून गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न करेल अशा गोंधळी खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्याचा नियम सरकारने बनवावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
कोणत्याही विषयावर संसदेत चर्चा व्हावी एका मर्यादेपर्यंत विरोध प्रदर्शन व्हावे मात्र विरोधासाठी संसदेचे कामकाज रोखणे अत्यंत चूक आहे.सलग तीन दिवसा पर्यंत गोंधळ घालून संसदेतील कामकाज रोखणे चूक आहे.यामुळे संसदेचा बहुमोल वेळ वाया जातो.त्यातून देशाचे नुकसान होते.त्यामुळे सलग तीन दिवस गोंधळ घातल्यानंतरही जो खासदार चौथ्या दिवशी संसदेत गोंधळ घालेल त्यास 2 वर्षांसाठी निलंबित करावे. सरकार पक्षाचा असो की विरोधी पक्षाचा खासदार असो सर्व खासदारांसाठी हा नियम बनवावा अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.
महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील महाड मध्ये एन डी आर एफ चा बेस कॅम्प उभरण्याची मागणी पुढे आली आहे.या मागणीला माझा पाठिंबा असून त्यासाठीचा प्रस्ताव आल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आपण प्रयत्न करू असे आठवले म्हणाले.
आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत खेळा नाही तर मोदींच्या समर्थनाचा मेळा होणार आहे असे आठवले म्हणाले. आगामी 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए चे सरकार निवडून येईल असा दावा आठवले यांनी केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात किती राजकीय पक्ष एकत्र येतील हा प्रश्नच आहे. विरोधी पक्षात एक नेता कुणी नाही.त्यामुळे मोदीं समोर कोणतेही मोठे आव्हान नाही असे आठवले म्हणाले.