डोंबिवली : कोकणासह विविध ठिकाणी आलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र पुरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासह त्यांचं दुःख हलकं करण्यासाठी अनेक  सामाजिक संस्था, संवेदनशील व्यक्ती शासनाच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या आहेत. डोंबिवलीतील पाटील दांपत्यानेही सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडवत वाढदिवसाचा खर्च टाळून ५ लाख रुपये या पुरग्रस्तांसाठी दिले आहेत. शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
 

गेल्या काही दिवसांत सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामूळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे तिकडचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून हे संसार पुनः उभे करण्यासाठी सर्वच ठिकाणाहून मदतीचे हात पुढे आले आहेत. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील विनायक आणि सुजाता पाटील या दांपत्याने वाढदिवसाच्या खर्चाला छेद देत तेच पैसे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले आहेत. पाटील दांपत्याने आज ५ लाखांचा धनादेश शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्याकडे सुपूर्द केला.दरम्यान शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखेतर्फे तब्बल १० हजार धान्याचे किट तयार करून ते पूरग्रस्तांना पाठविण्यात येणार असल्याचे शहरप्रमूख राजेश मोरे यांनी सांगितले. तसेच डोंबिवलीतील पाटील दांपत्याने दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *