कल्याण : कल्याण पडघा रोडवरील अत्यंत महत्वाचा असलेला गांधारी पुलाला तडे गेल्याच्या बातमीने सेामवार रात्रीपासूनच खळबळ उडाली, रात्रीपासूनच प्रशासन पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली आणि त्यानंतर रात्रीपासूनच हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मात्र तब्बल १५ तासानंतर पीडब्ल्यूडीच्या अधिका-यांनी केलेल्या पाहाणीत हा तडा नसून, वाहत असलेले काळे कापड आणि गवत असल्याचे आढळून आले. त्यामुळे काळया कापडयाने सगळयांची फसगत झाली. आणि पुलाला तडा गेला नसल्याचे सिध्द झाल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पूल वाहतूकीसाठी खुला करण्यात आला.
गांधारी पूल हा दळण वळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून या पुलावर मोठया प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. सोमवारी रात्री गांधारी पुलाच्या खांबाला तडा गेल्याचा फोटो पीडब्लूडी अधिका-यांनी कॅमे-या कैद केला होता पुलाला तडा गेल्याने खळबळ उडाली तातडीने सोमवारी रात्री हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आणि वाहतुकीला ब्रेक बसला. कल्याणहुन पडघ्याकडे जाणारी आणि पडघ्याहून कल्याणकडे येणारी अशी दोन्ही बाजूकडील वाहतुक पोलीस प्रशासनाने बंद केली. अचानक वाहतूक बंद केल्याने गांधारी पुला पलीकडे राहणाऱ्या नागरिकांची मात्र मोठीच गैरसोय झाली. त्यामुळे रात्री 11 नंतर या पुलावरील एसटी बस, खासगी बसेस, मालवाहतूक करणाऱ्या गाड्या, लहान मेाठी वाहनांमुळे वाहतूक ठप्प झालेली पाहायला मिळाली.
प्रशासनाचा गेांधळ
दरम्यान रात्री ११ वाजता वाहतुक बंद केलेल्या गांधारी पुलाची पाहणी करण्यासाठी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना तब्बल १५ तास लागले. विशेष म्हणजे सकाळी काही तास या पुलाची पाहणी करण्यासाठी लागणारी बोटही अनेक तासानंतर उपलब्ध झाली. यावरूनच प्रशासनाची कार्यतत्परता दिसून आली. दुपारी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत पुलाला कोणतेही तडे गेलेले नसून पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या काळ्या कापडाने सर्व गोंधळ उडाल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरामध्ये याठिकाणीही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. याच पुराच्या पाण्यामध्ये वाहून आलेले गवत आणि काळा कपडा गांधारी पुलाच्या खांबाला अडकला. पडघा दिशेकडील मधल्या खांबाला हे काळे फडके अडकून पडले होते. पूर ओसरल्यानंतर पाहणीसाठी आलेल्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना हे काळे फडके म्हणजे पुलाला तडा गेल्यासारखे दिसून आले. त्यांनी मोबाईल कॅमेऱ्यात फोटो काढून त्याची पाहणी केली असता हा तडाच असल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी काढल्याने गोंधळ उडाला. काळया कपडयाने सर्वांचीच धांदल उडवली. अखेर मंगळवारी संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास गांधारी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.