ठाणे दि. २३ : स्टेमच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ३४ गावाकरीता दररोज ११ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यापैकी भिवंडी तालुक्यातील २४ गावांना पाणीपुरवठा करताना स्टेमला विविध अडचणीना सामोरे जावे लागत होते परंतू ही अडचण आता दूर होणार आहे. या २४ गावासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिका क्षेत्राबाहेरून स्वतंत्र पाईपलाइन्स टाकण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. आज अर्बन सेंटर येथे स्टेमचे गव्हर्निग समितीचे अध्यक्ष नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचे स्टेमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.
या बैठकीला मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या महापौर ज्योत्सना हस्नाले, भिवंडी महानगर पालिकेच्या महापौर प्रतिभा पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, ठाणे महानगर पालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा, भिवंडी महानगर पालिका आयुक्त सुधाकर देशमुख, स्टेमचे महा व्यवस्थापक संकेत घरत, चौधरी तसेच स्टेमचे इतर अधिकारी उपस्थित होते.
स्टेम कंपनी द्वारे ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी आणि ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रातील ३५ गावांना व पाणी पुरवठा करण्यात येतो. ग्रामीण भागासाठी तसेच भिवंडी महानगरपालिका यांना पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था ही जलशुद्धीकरण केंद्र टेमघर येथून करण्यात येते. या जलवाहिन्याचे जाळे हे भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रातुन सन १९८४-८५ मध्ये अंथरण्यात आलेले आहेत. २४ गावांना केला जाणारा पाणी पुरवठ्यासाठी माणकोली एम बी आर ते खारबाव-कटाई-कांबे -शेलार बोरपाडा पर्यत ६०० मी.मी. अशी एकुण २२ कि.मी. लांबीची पाईपलाईन टाकण्यात येणार असून ही पाईपलाईन महापालिका क्षेत्रा बाहेरुन जाणार आहे. यासाठी ३४.७९ कोटीच्या प्रस्तावाला स्टेमच्या संचालक मंडळ आणि प्रशासकीय व वित्तिय मान्यता देण्यात आलेली आहे.
या गावांना मिळणार मुबलक पाणी
खारबाव, काटई, कांबा, अंजूर, अलीम्घर, सुरई, वेह्ले, माणकोली, भारोडी, दापोडे, गुंदवली, पूर्णे, कोपर, राहनाळ, काल्हेर, कालव्हार, कारिवली, वडूनवघर, वडघर, डूगे, जूनांदुरखी, सारंग, शेलार, बोरपाडा . तसेच पायेगाव, बंगालपाडा, खर्डी, मालोडी या चार गावांना अतिरिक्त पाणीसाठा जलसंपदा विभागाकडून उपलब्ध झाल्या नंतर प्रस्ताव संचालक मंडळ व गव्हर्निंग समिती पुढे मंजुरीसाठी ठेवण्यात यावा असे समितीने सूचित केले.
पाण्याचा प्रश्न सुटणार
जवळपास ३५ गावांपैकी २४ गावांचा पाण्याचा प्रश्न दीर्घकाळा पर्यत सोडविण्यात मदत होईल. जलवाहिनीचे देखभाल दुरुस्तीचे काम करणे सोपे होईल. स्टेमच्या महसूलात वाढ होईल. भविष्यातील वाढीव लोकसंख्येनुसार अतिरिक्त जवळपास ५० एमएलडी पाण्याची मागणी पूर्ण होऊ शकते. तसेच कशेळी व अंजूर मुख्य जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा होणाऱ्या १२ गावांचाही पाणी प्रश्न ह्या जलवाहिनीद्वारे पूर्ण होईल. तसेच देखभाल दुरुस्तीसाठी लागणारा खर्च बचत होईल.