ठाणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने ठाणे जिल्हयाला अक्षरश: झोपडून काढले. पण बारवी धरणात गेल्या वर्षीपेक्षा अवघे ५ टक्के पाणी साठा वाढला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्याची तहान भागवणारे बदलापूर जवळील बारवी धरण ५० टक्के भरले आहे. सध्या बारवी धरणात १६९.७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या वर्षी २० जुलै रोजी बारवी धरणात १५५ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध होता.
तीन वर्षांपूर्वी बारवी धरणाची उंची वाढविण्यात आली असून त्यामुळे ३४० लक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होत आहे. सध्या बारवी धरण ५० टक्के भरले असून २० जुलै रोजी धरणात १७० लक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे धरण ५० टक्के भरले असून धरणातील पाण्याची पातळी ६५ मीटरपर्यंत पोहचली आहे.
बारवी धरणातून ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर, उल्हासनगर या महापालिका क्षेत्रांत तसेच औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. गेल्या दोन -तीन दिवसांपासून बारवी धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे बारवी धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध होऊन पाणी कपात टळेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.