पुणे २१ जूलै : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांची पावले पुण्याकडे वळू लागले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुध्दा पुणे दौ-यावर आहेत. मात्र  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकत्यांनी शुभेच्छा देणारे फलक लावल्याने पुण्यात  फ्लेक्सबाजीला उधाण आलं आहे. 

२२ जूलै या एकाच दिवशी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस. त्यामुळे  नेत्यांना शुभेच्छांचे फलक लावण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांमध्ये पुण्यात चांगलीच स्पर्धा लागली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने हे फलकबाजीला आणखीनच रंग चढल्याचे दिसून येत आहे.

‘कारभारी लय भारी’, ‘बोले तैसा चाले’, ‘कृतीशील विचारांचा गतीशील नेता,’ ‘पुण्यनगरीचा विश्वास दादा म्हणजेच विकास’ अशा शब्दांमध्ये अजित पवारांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे ‘शिल्पकार नव्या पुण्याचे नेतृत्व नव्या महाराष्ट्राचे’, ‘विकासपुरुष’, ‘अद्वितीय कर्तृत्व आक्रमक नेतृत्व’ अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मात्र भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिका-यांनी  शुभेच्छांच्या मजकूरांवरून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टिका करण्याची संधी सोडलेली नाही. त्यामुळे सध्या फ्लेक्सबाजी पुणेकरांच्या चर्चेचा विषय बनला आहे. ———-

कोण पावरफुल ठरणार …

राजकारणात कोणीही कोणाचा मित्र अथवा शत्रू नसतो, याची प्रचिती राज्यातील जनतेला अनेकवेळा आली आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले फडणवीस -पवार एके सकाळी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचे अनेकांनी पाहिले, त्यानंतरच्या घडामोडीनंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार राज्यत सत्तेवर आले. त्यामुळे भविष्यात  राजकारणात काय घडेल हे आताच सांगता येत नाही, मात्र सध्या तरी पुण्याच्या आगामी निवडणुकीत फडणवीस पवार यांची चांगलीच जुगलबंदी रंगणार असून, कोण पावरफुल्ल ठरतोय हेच पाहावं लागणार आहे.

( सिटीझन न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook, Instagram  Twitter आणि  YouTube, Telegram  वर नक्की फॉलो करा )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!