पालघर दि २० : : ठाण्यातील पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी येथील रेल्वे ओव्हरब्रिजच्या मधल्या दोन मार्गिकांचे काम येत्या नऊ महिन्यांत पूर्ण करण्याची ग्वाही एमएमआरडीए आणि रेल्वेने दिल्यानंतर या पुलासाठी लागणारे गर्डर आणि बीम तातडीने ठाण्याला हलवण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
बोईसर येथे सुरू असलेल्या या कामाची पाहणी मंगळवारी शिंदे यांनी केली.पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी येथील रेल्वे ओव्हरब्रिजचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूकडील दोन मार्गिकांचे काम पूर्ण झाले असून अप्रोच रोडचे काम येत्या काही दिवसांत पूर्ण होताच या दोन मार्गिकांचा वापर सुरू केला जाणार आहे. मात्र, मधल्या दोन मार्गिकांचे काम नक्की कसे हाती घ्यावे, याबाबत काही प्रमाणात संदिग्धता होती. या मार्गावर असलेला वाहतुकीचा भार पाहता या दोन मार्गिकांचे काम दोन टप्प्यात पूर्ण करावे किंवा कसे याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, एमएमआरडीए आणि रेल्वेने नऊ महिन्यांत काम पूर्ण करण्याची ग्वाही दिल्यानंतर या दोन्ही मार्गिकांचे काम एकत्र हाती घेण्यावर शिकामोर्तब करण्यात आले आहे.
शिंदे यांनी मंगळवारी बोईसर येथील साई प्रोजेक्स्ट्स कंपनीच्या वर्क शॉपला भेट देऊन गर्डरच्या कामाची पाहणी केली. या पुलासाठी वापरण्यात येणारे भक्कम गर्डर आणि देशात पहिल्यांदाच वापरण्यात येणाऱ्या पूर्ण स्टीलच्या बीमच्या कामाची पाहणी त्यांनी केली. हे सर्व काम पूर्ण झाल्यामुळे हे साहित्य तातडीने ठाण्याला हलवण्याचे निर्देश त्यांनी दिले. पहिल्या दोन मार्गिका सुरू होताच मधल्या दोन मार्गिकांचे काम हाती घेण्यात येईल, असेही शिंदे यांनी सांगितले . याप्रसंगी ठाण्याचे खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक आणि एमएमआरडीए व मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.