ठाणे : दिवसभर खणखणणारा फोन… फोन उचलताच मी कोविड बाधित आहे….मला रुग्णालयात जायचे आहे.. असे समजताच तात्काळ त्या रुग्णांना दिलासा देवून त्यांना रुग्णवाहिकेची सोय करुन रुग्णाला संबंधित रुग्णालयात दाखल करण्याचे काम गेल्या वर्षभरापासून ठाणे महापालिकेच्या अद्ययावत अशा सेंट्रल कोविड वॉर रुमच्या माध्यमातून केले जात आहे. एकही दिवस बंद नसलेला हा वॉर रुम अत्यंत चांगल्या पध्दतीने 24 तास कोविडबाधित रुग्णांसाठी कार्यरत आहे, या वॉर रुमची पाहणी आज महापौर नरेश म्हस्के यांनी केली व या ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत वाढत असलेल्या कोविड 19 चा सामना करण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे अशा सूचना दिल्या.
कोविड 19 च्या काळात कोरोनाबाधित रुग्णांना तात्काळ माहिती उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीने मागील वर्षी अद्ययावत असा मध्यवर्ती कोविड वॉर रुम सुरू केली आहे. या वॉररुमच्या माध्यमातून गेले वर्षभर कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातील बेडची उपलब्धता याबाबत तात्काळ माहिती उपलब्ध होवून त्यांना आवश्यक ती मदत दिली जात होती. या ठिकाणी 24 तास चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उपलब्ध होणारी माहिती अद्ययावत करण्यासाठी 15 ते 20 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रुग्णांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम देखील या वॉररुमच्या माध्यमातून केले जाते. तसेच ठाणे जिल्हयातील रुग्णांना देखील खाजगी व शासकीय रुग्णालयातील बेड उपलब्धतेबाबत सहजरित्या माहिती उपलब्ध होत असल्यामुळे महापालिकेने सुरू केलेल्या वॉर रुमबाबत सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या वॉररुममध्ये गेले वर्षभरापासून डॉ. माधवी देवल या प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत तर डॉ. भरत कोलते, डॉ. गोविंद निगुडकर, डॉ. आशिष सिंग हे सहायक वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करीत आहे, तर वॉररुमच्या कार्यकारी अध्यक्षा म्हणून डॉ. खुशबू टावरी या काम पाहत आहेत.
येथे संपर्क करा …
या वॉररुमध्ये एकूण 10- दूरध्वनी नंबर कार्यान्वित केलेले आहेत. कोविड बाधितांनी 918657906798, 918657906802, 918657906792, 918657906793, 918657906791, 918657906796, 918657906797, 918657906794, 918657906795, 918657906801, या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.