मुंबई – देशभरातील सुमारे 12 लाख विद्यार्थी, तरुणांचे आत्मविश्वासपर प्रबोधन करून प्रेरणा देणारे मोटिवेशनल स्पीकर प्राध्यापक रत्नाकर आहिरे यांचा शनिवार, २७ फेब्रुवारी २०२१ रोजी पाँडिचेरी येथे मानद पीएचडी देऊन अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऑफ पीस, फ्लोरिडा विद्यापीठातर्फे सन्मान करण्यात आला. निस्वार्थी सेवाभावी वृत्तीतून तरूणाईला मार्गदर्शन करणाऱ्या अहिरे यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स फॉर अफर्मेटिव एक्शन (इका) या उद्योजकांच्या संस्थेचे ते सरकारी धोरणे आणि योजना विभागाचे मुख्य (व्हर्टिकल हेड) आहेत.

पाँडिचेरी येथील पंचतारांकित आनंदा इन या सुप्रसिद्ध हॉटेलच्या बँक्वेट हॉल मध्ये झालेल्या या पदवी प्रदान सोहळ्यास चेन्नई, पाँडीचेरी येथील तसेच देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री. अहिरे यांच्या समवेत 50 अन्य संशोधक अभ्यासकांनाही पीएचडी आणि संशोधनासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे सिक्कीम येथील आयसीएफएआय युनिव्हर्सिटीचे प्रकुलगुरू डॉ. जगन्नाथ पटनायक, ओरिसातील कलिंगा युनिव्हर्सिटीच्या प्रकुलगुरू डॉ. शर्वणी पटनायक, आंध्र प्रदेश सरकारकृत अत्यावश्यक वैदयकीय सेवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वरूप एमएसआर आणि ओरिसातील कटकचे माजी आमदार पर्वत बिलाल यांच्यासमवेत श्री. अहिरे यांनाही या स्नातकांना पदवी आणि पुरस्कार प्रदान करण्याचा मान देण्यात आला. शिक्षण लोकांना प्रबुद्ध करण्याचा मार्ग आहे. ती जबाबदारी स्वीकारून जनप्रबोधन करा, असे आवाहन या वेळी अहिरे यांनी केले.

अहिरे यांनी गेल्या वीस वर्षात तब्बल बारा लाख तरुणांना आपल्या प्रबोधनपर व्याख्यानांनी प्रेरित केले आहे. अनेक तरुणांना त्यांनी सकारात्मक जगण्याचा मार्ग दाखवला आहे आणि प्रगतीपथावर आगेकूच करण्याची उमेद दिली आहे. त्यांच्या याच कर्तृत्वाचा आणि सेवाभावी वृत्तीचा गौरव करण्यासाठी जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाने त्यांची आपणहून दखल घेत मानद पीएचडी प्रदान करण्यासाठी निवड केली होती. प्रशास ट्र्स्ट आणि ३१ व्हेंचर्स ने आय़ोजित केलेला हा पदवी प्रदान सोहळा करोना काळातील निर्बंधांमुळे मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत येथे पार पडला. या वेळी इकाचे पुडुचेरी अध्यक्ष एडवोकेट के. के. आर. राजा धनवेल, पुडुचेरी विमानतळाचे मुख्य हवाई वाहतूक नियंत्रक भारतभूषण कुलरतन, पुडुचेरीचे निवृत्त पोलीस अधिक्षक नंद गोपाल, आरोहन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय कुसळे, इकाचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते दक्षिणामूर्ती, वरिष्ठ व्यवस्थापक प्रदीप नाईक, त्यांच्या सुविद्य पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या किरण नाईक आणि इतर मान्यवर या पदवीप्रदान सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते. इकातर्फे के.के. आर राजा धनवेल, नंदगोपाल या मंडळींनी अहिरे यांचे पोंडीचेरीत स्वागत करून इका चे सदस्य असलेल्या उद्योजकांसाठी एक मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानाला उत्साही प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!