कल्याण : गेल्या 2-3 दिवसांपासून कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. एकीकडे कोवीडचे नियम न पाळणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली असतानाच आज सकाळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भाजी मार्केट आणि विविध दुकानांमध्ये सरप्राईज व्हिजिट दिल्याने दुकानदार गडबडून गेले. बऱ्याच ठिकाणी नागरिकांनी मास्क घातला नसल्याचे पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आले.
काही दिवसांपूर्वी 70 च्या आत असणारे कोरोना रुग्ण कल्याण डोंबिवलीतील गेल्या 2 दिवसांपासून 100 री ओलांडत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनही आणखीन सतर्क झाले असून कोवीड नियम पाळण्याबाबत नागरिकांना सतत आवाहन केले जात आहे. मात्र त्यानंतरही काही बेजबाबदार नागरिक मास्क वापरण्याबाबत उदासीन असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या या अचानक भेटीत आढळून आले.
तर लॉकडाऊनची गरज नाही…
कोवीडविरोधातील त्रिसूत्री सर्व नागरिकांनी व्यवस्थित पाळली पाहीजे. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स आणि हात धुणे या त्रिसूत्रीचा नागरिकांनी वापर केल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्याची आवश्यकता भासणार नसल्याचे महापालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी आणि दुकानदार, आस्थापना यांनी आपापली जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. हॉलमधील समारंभांना गर्दी झाल्यास गुन्हे दाखल करणार त्याचबरोबर लग्न हॉल, बँकवेट हॉलमध्ये साजऱ्या होणाऱ्या समारंभांवरही महापालिका प्रशासन करडी नजर ठेवली असून निर्बंधांपेक्षा जास्त गर्दी आढळून आल्यास आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
इमारत सील करणार …..
महापालिका क्षेत्रातील प्रभागक्षेत्रअंतर्गत कोविड रुग्ण ज्या इमारतीमध्ये आढळून आला आहे ती इमारत प्रतिबंधित / सील करावी, विना मास्क तसेच मास्क व तोंड झाकेल असा मास्क ज्यांनी परिधान केला नाही अशा नागरिकांवर पोलिस विभागाच्या मदतीने दंडात्मक कारवाई करावी. मॉल, भाजी मंडई, व्यापारी, दुकाने व इतर सार्वजनिक ठिकाणी येथील सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या व विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी,मंगल कार्यालये, बँकेट हॉल इत्यादी ठिकाणी लग्नसमारंभासाठी ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास व मास्क व सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसेल तर सदर अस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून आस्थापना सील करण्याची कारवाई करावी, त्याचप्रमाणे रेस्टॉरंट/ हॉटेल/ उपाहारगृहे/मद्यालये इ 50 टक्के क्षमतेने सुरू असल्याची तपासणी करून सदर नियमांचेच पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास त्या आस्थापनावर दंडात्मक कारवाई करून आस्थापना सील करण्याची कार्यवाही करावी. असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दिले आहेत.