ठाणे – ठाणे जिल्हयासाठी सन 2021-22 या अर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी 332.95 कोटी आदिवासी उपयोजनेसाठी 71.12 कोटी तसेच समाजकल्याण विभागाच्या अनु.जाती उपयोजने अंतर्गत 72.72 कोटी अशा एकूण 477कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही अशी ग्वाही नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे   पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्येक्षेखाली जिल्हा वार्षिेक योजनेची आँनलाईन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात  आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ, भाऊसाहेब दांगडे, अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील , समाजकल्याण अधिकारी बलभीम शिंदे, प्रकल्प अधिकारी श्रीमती किल्लेदार उपस्थित होते. 
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर कोरोनाविषाणूच्या प्रार्दुभावावर मात करण्यासाठी सदर बैठक प्रथमच ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना तसेच विशेष घटक योजनेच्या सन 20-21 च्या प्रारुप आराखड्यास मंजूरी देण्यात आली. 20-21 मधील 396 कोटी रुपयांच्या आराखड्यातील डिसेंबर 20 अखेर झालेल्या  खर्चाचा आढावा पालकमंत्री  .शिंदे यांनी घेतला.तसेच 20-21 पुर्नविनियोजनाच्या  प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
ठाणे जिल्हा विकासासाठी वाढीव निधीची मागणी राज्यस्तरीय बैठकीमध्ये करण्यात येणार असल्याचे   पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. कोरोनामुळे या आर्थिक वर्षात महसुलवाढीचा वेग मंदावला असला तरीही  ग्रामीण भागातील सर्वांगिण विकासासाठी रस्ते, पाणी, विज तसेच अन्य  प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असेही शिंदे यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील विविध समस्या मांडल्या. तसेच विविध विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्यानुसार संबंधित विभागांनी त्याची दखल घ्यावी तसेच विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश  शिंदे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी प्रास्तविक केले. यावेळी जिल्हा विकासाचा रोडमॕप त्यांनी सादर केला. राज्यात सर्वप्रथम ठाणे  जिल्ह्यात अॉनलाईन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे  आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. या बैठकीत  सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी अॉनलाईन   सहभागी झाले होते.

——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *