या, शतकातील आणि अनेक दशकातील अंधःकार दूर करणारा दीपस्तंभ तुम्ही आहात, ज्यांच्या सावलीचा ज्यांना विटाळ होता त्या माणसातील माणसांचा महामानव तुम्ही आहात!! सूर्याच्या तेजाप्रमाणे जागतिक स्तरावर तळपणारा मार्गदाता, मुक्तीदाता, ज्ञानप्रकाश तुम्ही आहात. परंतू # बा भीमराया# तुम्ही सांगितलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा, साधा विचार आत्मसात करू न शिकलेल्या कर्तृत्ववान बापाची निष्क्रिय, नालायक, बिगरस्वाभिमानी लेकरं आम्ही आहोत..बाबासाहेब आम्हाला माफ करा!! तुमच्या आसपास आपला फोटो झळकवण्याची तसेच अमका, फलाना ही नावे भूषण म्हणून डकवण्याची आमची लायकी नाही.. ज्या दिवशी आम्ही एकात एक होऊ आणि बापात लेक होऊ तेव्हाच तुम्ही आम्हाला माफ केलं असं मानू..! फक्त हे वंदन, अभिवादन आणि नतमस्तक होणं तुमच्या विचारांना, देश आणि प्रत्येक समाजासाठी अनमोल त्यागवृत्तीला… तुमचा हा विचार फक्त पुस्तकात मिळेल. पण, जात बघून वावरणाऱ्या मूर्ख मंडळींना नाही. प्रतिमेतल्या बाबासाहेबांच्या नजरेला नजर भिडवण्याची आमची औकात नाही…तुम्हाला दैवत मानू पण देवत्व बहाल करणारे नालायक तुमची औलाद कशी? आज तुम्ही हयात असता तर आमची पाठ पोकळ बांबूने फोडून काढली असती याची आम्हाला जाणीव आहे. कारण तुम्ही दिलेला बूद्ध आणि त्यांचा धम्म आम्ही आचरणात आणला नाही. त्या  बुद्धाला आणि बाबासाहेब तुम्हाला आणि हो छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले, माता सावित्रीबाई, माता जिजाऊ, माता रमाई, छत्रपती शाहू महाराज, संत कबीर ही नाव फक्त भाषणात उल्लेख करून त्यांनाही देवत्व बहाल केले आमच्या सवयंघोषित पुढाऱ्यांनी.  “रामकृष्ण गेले आणि बूद्ध भीम आले” असे खेदाने आमच्यातील लेखक मंडळी लिहितात..कारण बुद्ध विहार म्हणजे संपूर्ण जगाला समतेचा विचार देणार केंद्र. परंतु हे प्रत्येक माणसाला ज्ञान आणि सन्मार्ग दाखवणारे विहार न बनता फक्त बुद्ध पौर्णिमा, डॉ आंबेडकर जयंतीपुरत उघडून आम्ही तुमच्यासाठी तेवढ्या दिवसापुरत व्रतवैकल्य धारण केल. आज वशाट-पाशाट खायचं नाही..!!.बुद्ध धम्म हे आचरण आहे व्रत नाही, ते  व्रत असेल तर विचार स्वीकार करायचे आहे..हा साधा विचार तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आमच्यातील शिकल्या-सवरलेल्या लोकांनी आत्मसात केला नाही..पण, हो बाबासाहेब आम्ही तुमची सर्वच लेकरं नालायक नाहीत तर तुमच्या मताचे, विचारांचे अमृत प्राशन करून आम्ही आज पुस्तकातून तुम्हाला शोधतो आहे..आमची प्रगती मग ती वैचारिक, सामजिक, बौध्दिक असो तिला “आरक्षण” या चौकटीत बंदिस्त करणाऱ्याना आम्ही कधीच चपराक दिली आहे..तुम्ही म्हणाल्याप्रमाणे जगण्यातील संघर्ष आम्ही पदोपदी स्वीकारला आहे..म्हणून आज बा भिमा..  तुमच्या मताचे पाच लोक आहेत आणि तलवारीचे त्यांच्या न्यारे टोक आहे! हेच लोक बाबासाहेब तुमचा विचार पुढे घेऊन जात आहेत. मंत्री आणि श्रीमंतीपेक्षा झोपडी, चाळ, वस्तीत तुमचा विचार जिवंत आहे..येथे शिवाजी महाराज, संभाजी राजे, महात्मा फुले, संत कबीर, छत्रपती शाहू महाराज कॉलर उडवून गाडी आणि बंगला माडीचा माज दाखवून नाही तर विचारांतून शोधले जात आहेत…फक्त गाडीवर आणि बॉडीवर नाहीतर शिवराय, भीमराय, महात्मा फुले यांचे विचार मनाच्या पटलावर  कोरण्यात खरी मर्दुमकी..मग, आम्हाला बिनडोक म्हणायची हिम्मत कोण करेल?  आरक्षण शिक्षण आणि समाजात बरोबरीचे स्थान देते पण, संघर्ष जगण्याचे बळ देते. आरक्षण आर्थीक उत्कर्ष करेल, या गोड गैरसमजातून बाहेर पडायला आम्ही तयार नाही. बाबासाहेब पुस्तकाच्या पानोपानी सापडतात पुतळा, प्रतिमेत नाही. परंतु तरीही स्वार्थापायी तुम्हाला देवत्व बहाल करण्यासाठी आमचा आटापिटा सुरु आहे.  बा, भिमराया आज तुमचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन साजरा करताना आमच्या डोक्यात तुझ्या विचारांचा प्रकाश पडो, खरे शिवराय, खरे भीमराय त्यांच्या आचार- विचारांतून आम्हाला कळो! त्याच दिवशी आम्ही एक समाज म्हणून आपलं नाव तुमच्या प्रतिमेला अभिवादन करताना गर्वाने लावू!,,
विनोद साळवी , ज्येष्ठ पत्रकार

विनोद साळवी , ज्येष्ठ पत्रकार 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *