कल्याण (प्रतिनिधी ) : इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध डॉ. प्रशांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. आयएमए कल्याण शाखेचे 35 वे अध्यक्ष म्हणून डॉ. पाटील यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रमूख उपस्थितीत हा पदभार स्विकारला. तर सचिव म्हणून डॉ. ईशा पानसरे आणि खजिनदार म्हणून डॉ. सुरेखा इटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगसह इतर महत्वाचे नियम पाळून छोटेखानी स्वरूपात हा अध्यक्षपद नियुक्तीचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी कोरोनाशी लढताना निधन झालेल्या कल्याण आयएमएचे डॉक्टर पराग पाटील यांना उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोरोना काळात कल्याण आणि डोंबिवली आयएमएने केलेल्या कामाचे कौतूक करत ऋण व्यक्त केले. तर संपुर्ण महाराष्ट्रात कल्याण डोंबिवलीमध्ये ज्याप्रकारे खासगी डॉक्टरांनी केडीएमसीला सहकार्य केले तसे इतर कुठेही पाहायला मिळाले नाही अशी पोचपावतीही आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिली. तर जगातील काही देशांसह भारतातही काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचे सांगत कल्याण डोंबिवलीतील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी आपण गाफील राहून चालणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तर कोरोना काळात केडीएमसीच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलेल्या कल्याण ईस्ट मेडीकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे डॉ. देवेंद्र मिश्रा, नॅशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशनचे डॉ. अनिल पाटील होमिओपॅथी डॉक्टर फाउंडेशनचे डॉ. जयेश राठोड आदी संघटनांसह केडीएमसीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनाही यावेळी पालिका आयुक्तांच्या हस्ते गौरवण्यात आले.
दरम्यान आयएमएचे नाव अधिक उंचीवर जाण्यासह संघटना अधिक मजबूत होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. प्रशांत पाटील यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दिली. तसेच डॉक्टरांना भेडसावणाऱ्या समस्या शासन दरबारी मांडून सोडवण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कल्याण रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, इनर्व्हील क्लबच्या दिप्ती दिवाडकर, जायंट ग्रुपचे किशोर देसाई, शिक्षण तज्ञ भरत विशे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
*****