मुख्यमंत्रयाच्या गावातच काँग्रेस- राष्ट्रवादीचा सरपंच विजयी
नागपूर : नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसपुरस्कृत सरपंच निवडून आलाय. आपलं पॅनेलच्या धनश्री टोमणे या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. फेटरी गावातील हा पराभव फडणवीसांना धक्का समजला जात आहे.
सोमवारी राज्यातील दुस-या टप्प्यातील 18 जिल्ह्यातील जवळपास 4 हजार 119 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदासाठी मतदान प्रक्रीया पार पडली. यातील 380 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तर काही ठिकाणी विविध कारणांमुळे काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत.दुस- या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. फेटरी ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण नऊ जागांपैकी पाच जागा भाजपनं जिंकल्या असल्या तरी सरपंचपदी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत धनश्री टोमणे विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपप्रणित जनहित पॅनलच्या उमेदवार ज्योती भिमराव राऊत यांचा 97 मताने पराभव केला. आपलं पॅनलने सरपंचपद मिळवले पण 9 पैकी 4 सदस्यांमध्ये समाधान मानावे लागले.