फेरीवाल्यांना परवाने द्या : १ नोव्हेंबरला आझाद मैदानात धरणे आंदोलन
मुंबई : फेरीवाल्यांवरील बेकायदेशीर कारवाई तातडीने थांबविण्यात यावी व फेरीवाल्यांची नोंदणी करून परवाने देण्यात यावे या मागणीसाठी बुधवार १ नोव्हेंबर रोजी दुपारी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती मुंबई हॉकर्स युनियने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे स्थानक परिसर व एफओबीवरील फेरीवाल्यांना त्वरीत हटविले जावेत, अन्यथा मनसे स्टाईलने खळखटयाक करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन अनधिकृत फेरीवांल्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसारच पालिकेकडूनही अनधिकृतपणे बसणा-या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. मुंबई हॉकर्स युनियनने फेरीवाल्यांवर कारवाई करू नये अशी मागणी केलीय. फेरीवाल्यांना फेरीचा व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी सरकारने नियम बनवावेत असा निर्णय १९८५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रचुड यांनी दिलाय, मात्र २८ वर्षे फेरीवांल्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. मात्र जोपर्यंत फेरीवाल्यांसाठी कायदा बनवला जात नाही तोपर्यंत फेरीवाल्यांसाठी बनवलेली २०१० च्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात यावी. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०१३ मध्ये दिलाय. ज्यावेळेस कायदा बनेल त्यावेळेस फेरीवाला धोरण राबविण्यात यावे. 2014 मध्ये केंद्र सरकारने पथ विक्रेता अधिनियम २०१४ कायदा केला पण याचीही अमंलबजावणी केलेली नाही उलट फेरीवांल्यांकडून हप्ते वसुली करून त्यांच्यावर बेकायदेशीर कारवाई केली जात असल्याचा आरोप युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या अधिनियमाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, प्रत्येक वॉर्डात टाऊन व्हंडींग कमिटी बनविण्यात यावी त्यामध्ये फेरीवाल्यांचे प्रतिनिधी नेमण्यात यावे ज्या जागेवर फेरीवाले फेरीचा धंदा करतात त्या जागेवर जाऊन नोंदणी करून त्यांना परवाने देण्यात यावे अशीही मागणी युनियने केली आहे.