४८ तासाच्या आत खड्डा न बुजवल्यास ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी
ठाणे/ प्रतिनिधी : ठाणे शहर हे स्मार्ट सिटी अंतर्गत येत असून सुद्धा ठाणे शहरातील रस्त्यांची अवस्था खूपच बिकट झाली आहे आणि रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडलेले आहेत काही दिवसांवर गणेश उत्सव येऊन ठेपलेला असून देखील रस्त्यांची बिकट अवस्था झाल्यामुळे ठाणेकर नागरिकांना ऐन सणासुदीच्या काळात त्रास भोगावा लागणार आहे पावसाळ्या दरम्यान रस्त्यावर खड्डे दिसल्यास नागरिकांना खड्डे विषयक तक्रार करता यावी यासाठी महापालिकेने लेखी तक्रार करण्यासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे याअंतर्गत प्रामुख्याने भ्रमणध्वनी ॲप द्वारे तक्रार करणे ,संकेतस्थळाद्वारे तक्रार करणे, दूरध्वनीद्वारे तक्रार करणे ,ट्विटरद्वारे तक्रार करणे यासारख्या विविध पर्यायांचा अवलंब करणे आवश्यक आहे या पर्यायांचा वापर करून तक्रार केल्यानंतर साधारणपणे ४८ तासांच्या आत संबंधित अभियंता द्वारे व कंत्राटद्वारे खड्डे भरण्याची कारवाई करण्यात आली पाहिजे व तसे न झाल्यास संबंधित अभियंता किंवा कंत्राटदार याला पालिकेने दंड आकारणी केली पाहिजे अशी मागणी मनसेने केली आहे.
रस्त्यांबाबत ची तक्रार करायची असल्यास महापालिकेने विशेष भ्रमणध्वनी आधारित ॲप तयार केले पाहिजे ज्या ॲप मध्ये लोकांनी जीपीएस लोकेशन ऑन करून फोटो काढल्यास सदर फोटो कुठे काढला आहे याची माहिती भेटेल व महापालिका सदर लोकेशन च्या अनुषंगाने खड्ड्याचा शोध घेऊ शकेल व सदर खड्डा बुजवता येऊ शकेल .
सदर उपयोजना ही मुंबई महानगरपालिकेने यशस्वीपणे राबविली असून सदर योजनेअंतर्गत मुंबई महानगरपालिकेने MY BMC POTHOLE FIXIT हे ॲप सामान्य लोकांच्या खड्ड्यान संदर्भात तक्रार करण्यासाठी काढले आहे अशीच काहीशी उपयोजना ठाणे महानगरपालिकेने देखील केली पाहिजे ज्यामुळे ठाणेकर नागरिकांना खड्ड्यांच्या समस्येपासून लवकर सुटका मिळेल व महानगरपालिकेला देखील काम करण्यास सोयीस्कर पडेल अशी मागणी मनसेच्या स्वप्निल महिंद्रकर यांनी केली आहे.
ठाणे शहर हे सध्या तलावांचे शहर नसून ते खड्ड्यांचे शहर झाले आहे व यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नुसते कागदी घोडे नाचवणे सोडून काहीतरी ठोस उपायोजनांवर भर दिला पाहिजे असे मत मनसेच्या स्वप्निल महिंद्रकर यांनी व्यक्त केले आहे .