ठाणे (प्रतिनिधी) संततधार पावसामुळे शहरात खड्डे पडल्याच्या तक्रारी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी आज शहरातील खड्ड्यांची पाहणी करून तातडीने खड्डे भरण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले. दरम्यान खड्डे भरण्याचे काम सुरू झाले नाही तर संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई  करण्याचा इशाराही महापालिका आयुक्त डाॅ. शर्मा यांनी दिला.

आज सकाळपासूनच महापालिका आयुक्तांनी शहरातील खड्ड्यांची पाहणी करायला सुरूवात केली. या पाहणी दौ-यातंर्गत  त्यांनी दालमिल चौक येथील रस्त्यांची पाहणी करून एका बाजूचा राहिलेल्या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे. सदरचे काम आजच्या आज सुरू नाही झाल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. दालमिल चौकानंतर महापालिका आयुक्तांनी एम्को कंपनी येथील रस्त्यांची पाहणी करून रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम तसेच चेंबर कव्हर्स तातडीने बसविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर तीन हात नाका, कशीश पार्क, तसेच तीन हात नाका ते लुईसवाडी येथील सर्व्हिस रोडची पाहणी करून तेथील खड्डे तातडीने भरण्याचे आदेश दिले. यावेळी शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे उपस्थित होते. यावेळी महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी तीन हात नाका उड्डाण पुलावरी खड्ड्यांची पाहणी करून ते खड्डे तातडीने भरण्यासंदर्भात एमएमआरडीएच्या अधिका-यांशी चर्चा केली. या दौ-यात त्यांचे समवेत उप आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता रविंद्र खडताळे, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, उपनगर अभियंता रामदास शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!