ठाणे (प्रतिनिधी)- कोरोनाला अटकाव आणण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे गोरगरीबांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने तत्काळ लॉकडाऊन हटवावा; एसटी आणि टीएमटी सेवा सुरु करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राष्ट्रीय नेते अॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार, राज्यभरात ठिकठिकाणी डफली बजाओ आंदोलन छेडण्यात आले होते. अॅड बाळासाहेब आंबेडकर हे स्वत: नागपूरमध्ये आंदोलनात सहभागी झाले होते. 15 ऑगस्टपर्यंत सार्वजनिक वाहतूक सुरू करा अन्यथा नियम तोडू, असा इशारा आंबेडकर यांनी यावेळी दिला.
लॉकडाऊन लादून सर्व व्यवहार बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे टपरीवाले, फेरीवाले यांची आज उपासमार होत आहे. आज एसटी महामंडळावरही मोठ संकट आलं आहे. दोन महिने एसटीच्या कर्मचार्यांना पगार मिळालेला नाही. लॉकडाडाऊनमुळे गोरगरीबांचे जगणे असह्य झाले असल्याने हा लॉकडाऊन हटवून परिवहन सेवा सुरु कराव्यात,या मागण्यांसाठी अॅड. आंबेडकर यांनी ‘डफली बजाओ’ आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार मुंबई ठाण्यासह विविध शहरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकत्यांनी आंदोलन केली. ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात खोपट एसटी स्टँडसमोर ‘डफली बजाओ’ आंदोलन छेडण्यात आले. मनाई आदेश झुगारुन हे आंदोलन करण्यात आले असल्याने सुमारे 40 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. “ कोरोनाच्या महामारीमुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची मोठी हानी होत आहे. सर्वच व्यवहार बंद असल्याने गोरगरीबांना जगणे असह्य होत आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन हटविण्यात यावे; ठाणे शहरात टीएमटीच्या बसगाड्या सुरु कराव्यात; पश्चिम, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण आदी भागात जाण्यासाठी एसटी बससेवा सुरु करावी; ई-पास पद्धती बंद करावी; असंघटीत कामगारांना अर्थसाह्य देण्यात यावे,” अशा मागण्या करण्यात आल्या.
देशात महामारी आहे तर मग देशातील मृत्यूदर अर्ध्यापेक्षा कमी कसा?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवरून हा सवाल केला आहे. २०१९ मार्च ते मे दरम्यान अंदाजे १,२३,५१२ मृत्यू झाले, तर २०२० मध्ये याच काळात अंदाजे ७४,४१३ मृत्यू झाले. Pandemic/महामारी आली असेल तर हा मृत्युदर अर्धा कसा काय झाला? असे असताना हे सामान्य माणसाला रस्त्यावर आणणारं लॉकडाउन किती दिवस मान्य करायचं हे जनतेने ठरवावं असे आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.