एसटी कर्मचाऱ्यांचा  संप मागे घेण्याचे मुख्यमंत्रयाचे आवाहन 
 कर्मचा-यांच्या वेतनवाढीसाठी समिती 
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढीबाबत राज्य सरकारची सकारात्मक भूमिका असून यासाठी परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे. या समितीमध्ये एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांसह विविध एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी असतील. समितीने चर्चा करुन वेतनवाढीबाबत  तोडगा सादर करावा, तो निश्चित मान्य केला जाईल. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विविध एसटी कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान केले.
ऐन दिवाळीच्या तोंडावर 17 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्रयानी कर्मचारी संघटनेशी चर्चा करून संप मागे घेण्याचे आवाहन केले. एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होणेही गरजेचे आहे. त्यासाठी महामंडळाने स्त्रोत विकसीत करावेत. कर्मचारी संघटनांनीही याबाबत सूचना कराव्यात. शासनामार्फत त्यालाही निश्चित मान्यता देऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते म्हणाले की, दिवाळी सणामये जनतेची गैरसोय होऊ नये यादृष्टीने एसटी कामगार संघटनांनी संप करु नये, असे आवाहन केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या प्रश्नावर आपण सुरुवातीपासूनच सकारात्मक आहोत. एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आपण विविध निर्णयही घेतले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी आमदार जयप्रकाश छाजेड, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनचे अध्यक्ष शैलेश विश्वकर्मा, फेडरेशनचे मुख्य सचिव राजू भालेराव, कनिष्ठ कर्मचारी संघटनेचे अभय गुजर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *