ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहरात आणि जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असतानाच त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न जिल्हाधिकारी कार्यालय आणि पालिका, नगरपालिका आणि नगरपरिषद करीत असतानाच जिल्ह्याचे केंद्र असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयालाच कोरोनाने विळखा घातला. यामुळे जिल्ह्याचा कारभारही ठप्प होतो की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी आणि अन्य तीन कर्मचारी असे चारजण कोरोना बाधित झाले. यामध्ये उपजिल्हाधिकारी यांच्या वाहनचालकांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी ठाणे कार्यालय आणि जिल्ह्यातील विविध कार्यालय जी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत येतात. एकूण 18 बधितांपैकी 10 जण हे विविध कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी आहेत. तर 8 जण हे फिल्डवर काम करणारे कर्मचारी आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जवळपास 100 च्या आसपास कर्मचारी आहेत. त्यापैकी 50 टक्के कर्मचारी या आपत्ती काळात सेवेत रुजू होते. सदरचे कर्मचारी हे कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर आदी परिसरातून सार्वजनिक वाहनाने प्रवास करून कार्यालयात येतात यात बस आणि ट्रेन यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवासात कदाचित त्यांना लागण झाली असावी असे मत जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांनी व्यक्त केले. त्याच प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अनेकजण भेटण्यास किंवा विविध कामानिमित्त लोक येतात त्यामुळेही ही लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु जिल्ह्याचे कारभार हाकणारे कार्यालय कोरोनाच्या विळख्यात सापडल्यास जिल्ह्याचा कारभार ठप्प होईल अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. ठाण्यात 67 हजारापेक्षा जास्त रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत तर कोरोनाने मृतांचा एकदा हा 2 हजाराच्या आसपास पोचत आहे. तर 23 हजारापेक्षा जास्त रुग्ण जिल्ह्यात कोरोनाबधित असून ते उपचार घेत आहेत.