कल्याण/प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोवीड साथीला प्रतिबंध घालण्यासाठी महापालिका शर्थीचे प्रयत्न करीत आहे. आता ‘ *फॅमिली डॉक्टर ,कोव्हिड फाईटर’* ही संकल्पना महापालिका राबविणार आहे, या संकल्पनेचा शुभारंभ महापौर विनिता राणे यांच्या प्रभागात झाला. तापाच्या रूग्णाची मोफत अॅन्टीजेन टेस्ट करण्यात येणार असून, कोवीड बाधित रूग्णांच्या संख्येस आळा बसण्यास मदत होणार आहे.
या संकल्पने अंतर्गत महापालिकेच्या सर्व पार्षद प्रभागात असलेल्या फॅमिली डॉक्टरकडे OPD साठी येणाऱ्या तापाच्या रुग्णांची अँटीजेन टेस्ट नजीकच्या ठरवून दिलेल्या टेस्ट सेन्टरमध्ये करण्यात येणार आहे. यासाठी 5 ते 6 फॅमिली डॉक्टरांचा क्लस्टर तयार करण्यात येणार असून, त्यांच्या सोयीनुसार जवळच्या शाळेत/हॉलमध्ये टेस्ट सेंटर उभारण्यात येणार आहे
फॅमिली डॉक्टर हे त्या- त्या परिसरातील स्थानिकांचा विश्वासाचा आपला माणूस असल्याने त्याच्या मदतीने त्यांचेकडे तपासणी करण्यासाठी येणा-या तापाच्या रूग्णाची मोफत अॅन्टीजेन टेस्ट करण्यात येणार असल्याने, त्वरीत निदान होवून कोव्हिड बाधित रूग्णांचे लगेच अलगीकरण करून त्याची पुढील उपचार प्रणाली ठरविल्यामुळे कोव्हिड बाधित रूग्णांच्या संख्येस आळा बसण्यास मदत होणार आहे. या संकल्पनेचा शुभारंभ महापौर विनिता राणे यांच्या प्रभागात झाला. जुनी डोंबिवली येथील जनगणमन शाळेत,सदर परिसरातील फॅमिली डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांची शास्त्रीनगर रुग्णालयातील व परिसरातील डॉक्टरांनी तपासणी करून त्यातील संशयित 83 जणांची अँटीजेन टेस्ट केली असता त्यापैकी 34 जण पोसिटीव्ह आढळून आले,आता हा फॉर्म्युला फॅमिली डॉक्टर्स व नगरसेवक यांच्या सहकार्याने सर्वत्र राबविण्यात येईल असा मनोदय महापौर विनिता राणे यांनी व्यक्त केला. महापालिका सदस्यांनी देखील कोरोना समितीच्या माध्यमातून यामध्ये सहभागी होऊन महापालिकेस सहकार्य करावे आणि नागरिकांनी देखील ताप वा तत्सम लक्षणे आढळल्यास नजीकच्या टेस्ट सेंटर मध्ये जावून आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन महापौर विनिता राणे आणि आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
***