हमाल, डब्बेवाल्यांसाठी रेल्वेस्थानकात ज्ञानाचे दरवाजे खुले
मुंबई – बोरिवली स्थानकातील रेल्वे हमाल आणि डबेवाल्यांसाठी रविवारचा दिवस खास ठरला. वाचन प्रेरणादिनाच्या निमित्ताने हमाल व डबेवाल्यांसाठी बोरिवली रेल्वे स्थानकात वाचनालय सुरू करण्यात आलय. वाचनालयामुळे आता ज्ञानाचे दरवाजे खुले झाले आहे.
माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते. या निमित्ताने बोरिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर मुंबईच्या डबेवाल्यांना ग्रंथपेटी प्रदान करण्याचा कार्यक्रम आणि रेल्वे स्थानकावरील हमालांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत वाचनालयाचे उद्घाटन मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पार पडले. दरम्यान तावडे यांनी हमाल व डबेवाल्यांशी संवाद साधला. ते कोणती पुस्तके वाचतात, त्यांना कोणत्या पुस्तकाची आवड आहे, याविषयी त्यांनी संवाद साधला, वाचनामुळे व्यक्तीच्या ज्ञानात भर पडून व्यक्तीमत्वाचा विकास होतो, असे तावडे यांनी सांगितले. नेहमी धावपळ करत असलेल्या हमाल व डबेवाल्यांना वाचनाची आवड असते. आमची ही आवड जोपासण्यासाठी आता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हमाल व डबेवाल्यांशी संवाद साधताना तावडे यांनी ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांच्या ‘चकवा चांदण’ या पुस्तकातील काही परिच्छेदही वाचून दाखविले. हमाल बंधूनीही आपण ज्ञानेश्वरी, पोथी यांचे वाचन करीत असतो, परंतु या ग्रंथपेटी व वाचनालयामुळे आम्हाला विविध साहित्यिकांचे साहित्य एकाच ठिकाणी वाचनाची संधी मिळणार असल्याने आभार मानले. डिंपल प्रकाशन , व्यास क्रिएशन, ठाणे व ग्रंथसखा वाचनालयाचे श्याम जोशी यांचे सहकार्य लाभले. हमाल व डबेवाल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या वाचनालयासाठी त्यांनी पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, हमाल संघटनेचे अध्यक्ष भाऊराव चव्हाण, डबेवाले संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर, माजी अध्यक्ष सोपान मरे, रेल्वेचे डी. के. श्रीवास्तव, बोरिवली रेल्वे स्थानकाचे मिलिंद पवार आदी मान्यवर उपस्थित होते