कल्याण / प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात करोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. बुधवारी ४७१ नवीन रूग्ण आढळून आले तर ७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा दहा हजार पार झाल्याने चिंता अधिकच वाढली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका क्षेत्रात १२ जूलैपर्यंत लॉकडाऊन लागू असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
कल्याण डोंबिवलीत कारोनाचा विळखा वाढत असून दररोज चारशेच्यावर रूग्ण आढळून येत आहेत. बुधवारी नव्याने आढळून आलेल्या रूग्णांमध्ये कल्याण २२८ डोंबिवली २०६, टिटवाळा आंबिवली, पिसवली ३७ रूग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १० हजार ३७१ वर पोहचली आहे. सध्या ५ हजार २४७ रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण ४ हजार ९४६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात १३ मार्च रोजी पहिला रूग्ण आढळला. दररोज २० ते २५ रूग्ण संख्येचा आकडा आता थेट साडेचारशे पाचशेवर पोहचला आहे. साधारण एक हजार रूग्णांचा आकडा गाठायला मार्चपासून ते मे अखेरपर्यंत तब्बल देान महिने लागले होते. मात्र जून महिन्यापासून कोरोना रूग्ण संख्येचा ग्राफ झपाटयाने वाढताना दिसत आहे. १ जून ते १५ जूनपर्यंत १२७४ रूग्ण आढळून आले. तर १६ ते ३० जून या दरम्यान हा आकडा चौपट होऊन ४ हजार ३०२ रूग्णांची नोंद झाली. जून महिन्यातच रूग्ण संख्या साडेपाच हजारावर पोहचली. तर १ जूलैपासून ते ८ जूलैपर्यंत तब्बल ३७७६ रूग्ण आढळून आले आहेत. एकिकडे रूग्ण संख्येचा वेग झपाटयाने वाढत असतानाच मृतांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. दररोज सरासरी दोन ते तीन रूग्णांचा मृत्यू होत असून, आतापर्यंतच्या मृतांचा आकडा १२७ वर पोहचला आहे. वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर १२ जूलैपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे लॉकडाऊनला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश येईल असेच चित्र दिसून येत आहे. —————-
काय आहेत सोयी सुविधा …
महापालिकेने १७ खाजगी रुग्णालयासोबत सामजंस्य करार केला आहे. डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकूलातील बंदिस्त बॅडमिंटन कोर्ट येथील ३० बेडचे आय.सी.यु व १५५ बेडचे ऑक्सिजन सुविधा सुरु करण्यात आली आहे. डोंबिवलीतील जिमखाना येथ ७० बेडचे आय.सी.यु. व ३० बेडचे ऑक्सिजन सुविधा तसेच बीओटी तत्वावरील आर्ट गॅलरीमध्ये १२० बेडस आय.सी.यु व २५० बेडचे ऑक्सिजन सुविधा १५ जुलै, २०२० कार्यान्वित होणार आहे. आता सुमारे ८०० टेस्ट प्रतिदिन होत असून त्या २ हजार प्रतिदिन करण्याचा पालिकेचा मानस आहे.
——————
रूग्ण संख्येचा आलेख …
१ जूलै : ३५० रूग्ण २ जूलै : ५६० रूग्ण ३ जूले : ५६४ रूग्ण ४ जूलै : ५५५ रूग्ण ५ जूलै : ४८२ रूग्ण ६ जूलै + ४१३ रूग्ण ७ जूलै : ३८१ रूग्ण ८ जूलै : ४७१ रूग्ण —————————-