वादळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार काहीही कमी पडू देणार नाही : एकनाथ शिंदे यांची ग्वाही 

कोकणातील वादळग्रस्त गावांची पाहाणी

·      ग्रामस्थांशी साधला संवाद
·      वीजपुरवठा, पाणीपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे प्रशासनाला निर्देश
·      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हीसीमध्ये सहभागी होऊन मांडली परिस्थिती

मुंबई – निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील गावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राज्य सरकार या गावांना आणि ग्रामस्थांना पुन्हा आपल्या पायावर उभे करण्यासाठी काहीही कमी पडू देणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७५ कोटी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २५ कोटी रुपये तातडीची मदत म्हणून जाहीर केले आहेत, असेही श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेल्या रत्नागिरी जिल्यातील काही गावांना भेटी देऊन श्री. शिंदे यांनी नुकसानीची पाहाणी केली. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, तसेच मंडणगड आदी परिसरातील मोठ्या भागाला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे.  शिंदे यांनी रविवारी आंजर्ले, पाडले, हर्णे, केळशी आदी गावांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. झाडेच्या झाडे उन्मळून पडली असून अनेक घरांचीही पडझड झाली आहे. विजेचे खांबही उलथून पडले असून त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे, तर अनेक ठिकाणी पाणीपुरवठ्यातही अडथळे येत आहेत. या सर्व परिस्थितीचा आढावा शिंदे यांनी घेतला.

नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश याप्रसंगी  शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. वीज पुरवठा तसेच पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यावर लक्ष केंद्रित करा. पडलेली झाडे, तसेच घरांचे ढिगारे लवकरात लवकर उचलून रस्ते मोकळे करा, जेणेकरून वाहतुकीतील अडथळे दूर होतील आणि मदतकार्य अधिक प्रभावीपणे करता येईल, असेही . शिंदे यांनी सांगितले.

याप्रसंगी ग्रामस्थांशीही संवाद साधून  शिंदे यांनी त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. या गावांच्या मदतीसाठी राज्य सरकार काहीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. लोकांच्या सतर्कतेमुळे तसेच जिल्हा प्रशासनाच्या दक्षतेमुळे एवढ्या मोठ्या चक्रिवादळातही मनुष्यहानी झाली नाही, ही समाधानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी परिवहन मंत्री अनिल परब, आमदार योगेश कदम, भरत गोगावले, दापोली प्रांताधिकारी शरद पवार, चिपळूण प्रांताधिकारी प्रवीण पवार, शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख सचिन कदम आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हीसीमध्ये सहभागी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी वादळाचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यांचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतला. त्यातही श्री. शिंदे यांनी दापोली तहसीलदार कार्यालय येथून सहभागी होऊन येथील परिस्थिती मांडली. फयान वादळाच्या वेळी वादळाचा फटका बसलेल्यांना सरकारने रोख मदत केली होती, त्या धर्तीवर मदत करण्याची ग्रामस्थांची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, बागांमध्ये जी झाडे कोसळून पडली आहेत, त्यांची साफसफाई करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाची मदत घेण्याची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. विजेचे खांब आणि ट्रान्स्फॉर्मर्सचे नुकसान झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे तातडीची बाब म्हणून जनरेटरच्या साह्याने या पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची सूचनाही श्री. शिंदे यांनी केली.
एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे जिल्हा शिवसेनेने वादळामुळे नुकसान झालेल्या गावांसाठी एक ट्रक धान्य आणि पाच हजार चादरी अशी मदत रवाना केली आहे. दापोली परिसरातील गावांमध्ये या साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *