शहीद प्रवीण येलकर यांना अखेरचा निरोप
कोल्हापूर : जम्मू काश्मीरमधील कारगील परिसरातून भारतात घुसखोरी करणार्‍या पाकिस्तानी दहशतवाद्यांना सडेतोड जबाब देणारे प्रवीण येलकर हे शहीद झाले.  शनिवारी त्यांच्यावर आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील  भैरवनाथ हायस्कूलच्या मैदानावर शासकीय व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  शहीद जवान प्रवीण येलकर यांच्या पार्थिवास त्यांचे बंधू राजेंद्र यांनी मुखाग्नी दिला. यावेळी पत्नी पूनम येलकर, चार वर्षाची मुलगी प्रांजल, वडील तानाजी येलकर, आई शालन येलकर यांच्यासह उपस्थित प्रत्येकजण  गहिवरुन गेला.

शहीद प्रवीण येलकर यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव शनिवारी सकाळी बहिरेवाडी येथे मुळगावी  आणण्यात आले. यानंतर गावातून त्यांच्या पार्थिवाची फुलांनी सजविलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने जमलेल्या लोकांनी साश्रुनयनांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी केली. पंचक्रोशीत प्रवीण येलकर अमर रहे.. वीर जवान तुझे सलाम अशा घोषणांचे बॅनर्स लावण्यात आले होते. रस्त्याच्या दुतर्फा महिला, आबालवृध्द, तरूण मुले, मुली, शाळेची मुले, शहीद प्रवीण येलकर अमर रहे च्या घोषणा देत होते. यावेळी लष्करी व पोलीस दलातील जवानांनी शहीद प्रवीण येलकर यांना बंदुकीच्या तीन फैरी झाडून अखेरची मानवंदना दिली. सरकारच्यावतीने शहीद प्रवीण येलकर यांच्या पार्थिवास जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. आमदार हसन मुश्रीफ, पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्यासह इतर अधिकारी आणि मान्यवरांनी शहीद प्रवीण येलकर यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून आदराजंली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *