राज्य सरकारला खड्डे मुक्त महाराष्ट्र करता येत नाही ; 

राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका  

 डोंबिवली (प्रतिनिधी) : राज्यात सव्वा लाख विहिरी बांधल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. कदाचित त्यांनी महाराष्ट्रातील खड्डे मोजले असतील. त्यांना खड्डे मुक्त महाराष्ट्र करता येत नाही अशी खरमरीत टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीत मुख्यमंत्र्यांवर केली. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावे लागले याची यादीही राज ठाकरे यांनी सभेत वाचून दाखवली.

डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार मंदार हळबे आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघा चे उमेदवार प्रमोद (राजू )पाटील यांच्या प्रचारार्थ डोंबिवली पूर्वेतील डी एन सी मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी राज  ठाकरे बोलत होते. ठाकरे पुढे म्हणाले की,  स्वातंत्र्याला 72 वर्षे होऊनही चांगले रस्ते, स्वच्छ पाणी, उत्तम आरोग्य याच प्रश्नावर आजही निवडणुका लढविल्या जात आहेत. याला काय म्हणावं.  तुम्हाला ही परिस्थिती आवडत असेल तर मग कशाला निवडणुका घ्यायच्या ? मग असेच जगा.  तुम्ही थंड आहात, म्हणूनच शहर बकाल होत आहेत असा घणाघात यावेळी  ठाकरे यांनी  केला.

 स्मार्ट लोकांची बकाल सिटी ..
शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात  झाल्या. एखाद्या शहराची ओळख असते. त्याचप्रमाणे डोंबिवली हे सुशिक्षि ताचच बकाल शहर म्हणून ओळख झालीय. केडीएमसी स्मार्ट सिटी घोषित केली आहे. पण  स्मार्ट लोकांची बकाल सिटी असल्याचं वर्णन राज यांनी केलं. सर्वाधीक सीए डोंबिवलीत राहतात. मग शहराच अकाउंट चेक केलं नाही कधी ऑडीट केल नाही त्यामुळे शहर बकाल झाल्याचेही ठाकरे म्हणाले. देशात सर्वाधिक लोंढे ठाणे जिल्ह्यात येत आहेत याकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नाही . पश्चिम बंगाल मधील मंत्रालयाच्या लिफ्ट मध्ये बंगाली भाषेत किशोर कुमारची गाणं ऐकायला मिळावी. पण आपल्याकडे मंत्रालयात लतादीदी आशाताईची गाणी लावतील का ? असाही सवाल राज यांनी विचारला. यावेळी डोंबिवली चे उमेदवार मंदार हळबे आणि कल्याण ग्रामीण चे उमेदवार प्रमोद (राजू ) पाटील यांनी आपल्या मतदार संघात कशाप्रकारे विकास करणार याचे व्हिजन मांडले.  डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम, महिला अध्यक्षा दीपिका पेडणेकर, प्रल्हाद म्हात्रे यांचीही  भाषणे झाली.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *