ठाण्यातील क्लस्टर योजनेला मंजूरी ! देशातील पहिली महापालिका ; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहरातील किसननगर वागळे इस्टेट परिसरात राबविण्यात येणा-या नागरी समूह विकास योजनेला (क्लस्टर डेव्हलपमेंट) मंजूरी मिळाली आहे. हा प्रकल्प राबविणारी
ठाणे महानगरपालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे अशी माहिती राज्याचे सार्वजनिक (उपक्रम) तथा आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे
यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे, सभागृहनेते नरेश म्हस्के स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृहनेते नरेश म्हस्के, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, सहाययक संचालक नगररचना देशमुख शहर नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर आदी उपस्थित होते.
नागरी समूह विकास योजनेची माहिती देण्यासाठी महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. ठाण्याच्या किसननगर वागळे इस्टेट येथे मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत धोकादायक इमारतीमध्ये दहा लाखाहून अधिकनागरिक राहतात. या रहिवाशांना सुरक्षित असे स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शासनस्तरावर सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून किसननगर, वागळे इस्टेट परिसरातील नागरी विकास समूह योजनेला मंजुरी मिळाली आहे. या योजनेमुळे किसननगर जयभवानीनगर एकमेकांना जोडले जाणार आहे. या पहिल्या टप्प्याला तत्वतः मान्यता मिळाली आहे. प्रायोगिक तत्वावर किसननगर, वागळे इस्टेट येथील राबविण्यात येणा-या योजनेचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर लोकमान्यनगर, राबोडी या बायोमेट्रिक सर्वेक्षण झालेल्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी अनधिकृत, धोकादायक इमारती आहेत अशा हाजुरी, राबोडी, लोकमान्यनगर, विटावा, मुंब्रा या ठिकाणी देखील ही नागरी विकास समूह योजना राबविणे सहज शक्य होणार असल्याचे देखील पालकमंत्री यांनी सांगितले. या योजनेसाठी सहकार्य करणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, राज्यशासन, एमएमआरडीए, एमआयडीसी, ठाण्याच्या महापौर, सर्व पदाधिकारी, पालिका आयुक्त व सर्व अधिकारी या सर्वांचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी आभार व्यक्त केले.
——————————-
दहा लाखाहून अधिक नागरिकांना हक्काचे घर मिळणार ..
ठाण्यात नागरी समूह विकास योजनेला (क्लस्टर डेव्हलपमेंट) मंजूरी मिळाली असून, या योजनेमुळे जवळपास 10 लाखाहून अधिक नागरिकांना आपल्या हक्काचे घर मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आल्यामुळे आजचा हा दिवस ठाणेकरांसाठी आजचा ऐतिहासिक असा दिवस आहे असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक (उपक्रम) तथा आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या योजनेत घरमालकाला 300 चौ.फूटाचे घर मोफत मिळणार आहे. तसेच भोगवटादाराला साडेबारा टक्के मोबदला तसेच मालकी हक्काचे घर मिळणार आहे. तसेच या योजनेमुळे परिसरातील रस्ते देखील रुंद होणार असून या ठिकाणी सुनियोजित पार्किंग, शाळा, बहुउद्देशीय सभागृह, उद्योगकेंद्र देखील असणार आहे. तसेच वाणिज्य व औद्योगिक भागातून रोजगार देखील उपलब्ध होणारअसल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले की, किसननगर, वागळे इस्टेट या ठिकाणी राबविण्यात येणा-या क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेला प्रशासकीय स्तरावर तत्वतः मंजुरी देण्यात आल्याने ठाणेकरांसाठी आजचा दिवस अतिशय महत्वपूर्ण असाच आहे.या ठिकाणी राबविण्यात येणा-या योजनेचा आराखडा कसा असावा, प्रत्यक्ष किती जागा देण्यात यावी याचा सर्व अभ्यास महापालिका स्तरावर करण्यात आला आहे. तसेच किसननगर ही दाट वस्ती असून या ठिकाणी क्लस्टर राबविणे हे सर्वात मोठे आव्हान होते. या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था करुन मगच नवीन बांधकाम करणे हे आव्हान होते, परंतु या गोष्टींचा सर्वंकष अभ्यास करण्यात बराच कालावधी गेल्याने या योजनेला विलंब झाल्याचेही आयुक्तांनी नमूद केले. आजपर्यत असा प्रकल्प कुठेही झाला नसून वसलेल्या शहराला बदलून नवीन शहर करणे हे ठाणे शहरात होत असून हा प्रकल्प देशातील सर्वात मोठा प्रकल्प असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच क्लस्टरमध्ये 6 मीटर ऐवजी 40 मीटरचे रस्ते येणार आहेत, रस्त्यांच्या सीमांकनामध्ये 600 च्या सुमारास घरे असून या 600 कुटुंबांचे स्थलांतर करण्यासाठी एमएमआरडीएने भाडेतत्वावर घरे उपलब्ध करुन देण्यासाठी मंजूरी दिली असून या रहिवाशांना स्थलांतर करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी यावेळी नमूद केले.
**