कोणतीही सुरक्षा न बाळगता आयरे रोड येथील धोकादायक इमारतीचे पाडकाम ; विद्यार्थी नागरिकांची सुरक्षा धोक्यात
पालिका अधिकारी नगरसेवक लक्ष देतील का ?
डोंबिवली (प्रतिनिधी ) : डोंबिवली पूर्वेतील जुने आयरे रोड परिसरातील श्रीनिवास या धोकादायक इमारतीचे पाडकाम सुरू आहे. मात्र कोणतीही सुरक्षा न बाळगता हे पाडकाम सुरू असल्याने शेजारच्या इमारतीतील राहिवाश्यांची आणि पादचारी, विद्यार्थी यांची सुरक्षा धोक्यात सापडली आहे.
सोमवारपासून या धोकादायक इमारतीचे पाडकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र कोणत्याही प्रकारचे नेट बांधण्यात आलेले नाही. त्यामुळे इमारतीचा तोडलेला भाग रस्त्यात पडत आहे. इमारतीच्या खालून रहदारीचा रस्ता असल्याने हा भाग एखाद्या पादचाऱ्याच्या अंगावर पडून जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे इमारतीचे पाडकाम सुरू असलेल्या शेजारच्या इमारतीत नर्सरी सुरू आहे. त्याठिकाणी लहान विद्यार्थी आणि पालकांची ये-जा सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची सुरक्षा धोक्यात सापडली आहे. मात्र यासंदर्भात पालिका वार्ड अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक नितीन पाटील यांच्याकडे तक्रार करूनही त्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
त्यामुळे सुरक्षिततेची साधने वापरून या इमारतीचे तोडकाम करावे अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
***