प्रत्येक गाव, जिल्हा तसेच महानगराकरिता असावी एक मॅरॅथॉन स्पर्धा- राज्यपाल विद्यासागर राव

मुंबई  (अजय निक्ते) :  श्रीमंत-गरीब, तरुण-वृद्ध, महिला-पुरुष, दिव्यांग-सामान्य यांसारखे सर्व भेद दूर करणारी मॅरॅथॉन लोकशाही व सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करणारी स्पर्धा आहे. प्रत्येक गाव, जिल्हा तसेच महानगराकरिता आपली एक मॅरॅथॉन स्पर्धा असावी. त्यातून परस्पर बंधुभाव वाढून राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होईल, असे उद्गार राज्यपाल विद्यासागर राव यांनी काढले.  रविवार दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरॅथॉन स्पर्धेच्या नावनोंदणीला राज्यपालांच्या उपस्थितीत गुरूवारी राजभवन येथे प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते.

मॅरथॉन स्पर्धेने फिटनेस व आरोग्याबद्दल व्यापक जनजागृती केली आहे. स्पर्धेने विविध समाजसेवी संस्थांसाठी ४० कोटींचा निधी उभारला आहे, याबद्दल राज्यपालांनी आयोजकांचे अभिनंदन केले. सन २०२० साली होणाऱ्या मॅरथॉन स्पर्धेत ५० हजार लोक सहभागी होतील तसेच मॅरॅथॉनच्या माध्यमातून सेवा कार्यासाठी ५० कोटी रुपये निधी संकलित होईल, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबई मॅरॅथॉन ही पर्यावरणपूरक ग्रीन मॅरॉथॉन होईल, असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. शालेय शिक्षण व क्रिडामंत्री आशिष शेलार यांनी मुंबई मॅरॅथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला आमदार राज पुरोहित, उपमहापौर हेमांगी वरळीकर,रिअर ॲडमिरल राजेश पेंढारकर, शायना एन सी व प्रायोजक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *