महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिवपदी संतोष केणे यांची नियुक्ती
डोंबिवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिवपदी संतोष केणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशावरूनच ही नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी व काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठीच आपले योगदान राहिल अशी अपेक्षा सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांनी नियुक्ती पत्रात व्यक्त केलीय.
डोंबिवली पूर्वेतील आयरेगाव परिसरात संतोष केणे राहतात. काँग्रेसचे घराणे म्हणूनच केणे कुटूंबियांकडे पाहिले जाते. काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणूनच केणे यांची ओळख आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत काँग्रेसचे नगरसेवक म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. त्यामुळे त्यावेळी पक्षाने पालिकेतील काँग्रेसचे गटनेता म्हणून त्यांची निवड केली होती. मध्यंतरीच्या काळात प्रदेश प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीत त्यांनी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. अध्यात्मिक क्षेत्राशी संल्ग्न असणारे व सर्वसामान्यांच्या मदतीला धावणारा कार्यकर्ता म्हणूनच त्यांची ओळख आहे. राज्याचे मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जायचे. त्यावेळी काँग्रेस सरकारच्या काळात कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्हयातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला व बहुतांशी प्रश्न मार्गी लावले. केंद्र व राज्य सरकारच्या मोठया मोठया प्रकल्पात स्थानिक भूमीपुत्र शेतक-यांच्या जमीन बाधित होत आहे. मात्र त्यांना योग्य तो मोबदला मिळण्यासाठी केणे यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू आहे. मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि पालघर जिल्हयातील स्थानिक भूमीपुत्रांच्या प्रश्नावर ते लढत आहेत. त्यामुळे आगरी कोळी भूमीपुत्र व बहुजन समाज मोठया प्रमाणात त्यांच्या पाठीशी आहे. सर्वच राजकीय पक्षात त्यांचे सलोख्याचे संबध असून, जनसंपर्क दांडगा आहे. काँग्रेस पक्षाला अनेकवेळा घरघर लागली अनेकजण पक्ष सोडून गेले. मात्र केणे हे काँग्रेसमध्येच राहिले. निष्ठावंत असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे केणे यांचे सर्वत्रच अभिनंदन होत आहे.