इकबाल कासकरसह तिघांना आठ दिवसाची पोलीस कोठडी
राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा समावेश ?
ठाणे : बिल्डरकडे खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर आणि त्याच्या तीन साथीदारांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच खंडणी रॅकेटमध्ये ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवकांचा समावेश असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. आरोपींनी चौकशीत त्या नगरसेवकांची नावं घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनीही खंडणी टोळीत राजकारण्यांची नावं असल्याची शंका व्यक्त केली होती. मात्र याची माहिती अजूनही पोलीसांकडून मिळालेली नाही.
सोमवारी रात्री उशिरा ठाणे खंडणीविरोधी पथकाने कासकरला भायखळा येथून अटक केली होती त्याला मंगळवारी ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ठाणे येथील खंडणीविरोधी पथकात चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मा यांची अलीकडेच नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी कासकर याला अटक करून मोठी कारवाई केली आहे. खंडणीप्रकरणात दाऊद इब्राहिमचा सहभाग आहे का याचा तपास सुरू असून दाऊदचा सहभाग असल्यास त्यालाही आरोपी केलं जाईल अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.