पाटकर पार्किंग प्लाझाच्या प्रस्तावाला दुसऱ्यांदा प्रस्तावाला स्थगिती
डोंबिवली : येथील पूर्वेतील पाटकर प्लाझा कॉम्प्लेक्सच्या बेसमेंट मध्ये रिक्षा थांबे हलविण्यात यावेत यासाठी ब्यारिगेट्स खरेदीचा प्रस्तावाला शनिवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत पुन्हा एकदा स्थगिती मिळाली. आरक्षित जागेत बदल करण्याचा अधिकार महासभेला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव येत्या महासभेत पटलावर ठेवण्यात येईल असे आदेश स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी दिले.
डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात बेशिस्त पध्दतीने लावण्यात येणाऱ्या रिक्षा आणि यामुळे होणारी वाहतूककोंडी हि डोंबिवलीकरांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. आणि यावरच मात करण्यासाठी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी येथील पाटकर प्लाझा कॉम्प्लेक्सच्या बेसमेंट मध्ये रिक्षा थांबे हलविण्यात यावेत असे आदेश दिले होते. यालाच अनुसरून ब्यारिगेटस खरेदीसाठीचा प्रस्तावा ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या स्थायी समितीने स्थगित ठेवला होता. आणि आज पुन्हा सभापती म्हात्रे यांनी सांगितले की सदर जागेचे आरक्षण हे पार्किंगसाठी होते. तर याजागी जर रिक्षा थाबे उभे करावयाचे असल्यास त्या आरक्षणात बदल करावा लागेल असे सांगून हा प्रस्ताव स्थगित ठेवावा असे सांगितले. तर या संदर्भात भाजपचे नगरसेवक व सदस्य संदीप पुराणिक यांनी हा विषय यापूर्वीही झाला आहे. यासाठी लागणारे सर्वेक्षणही करण्यात आले असल्याचे सांगितले. तर यामुळे इंदिरा चौकात होणारी वाहतूक कोंडी तरी सुटेल असेही पटवून दिले.मात्र यासाठीची मान्यता आपल्याला महासभेतच घ्यावी लागेल असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
युतीच्या राजकारणात विकासकामांना बसतीये खीळ
इंदिरा चौकात वाहनांची होणारी घुसमट विचारात घेऊन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी वाहतूक, ‘केडीएमटी’, ‘आरटीओ’, पालिका अधिकाऱ्यांसह डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात संयुक्त दौरा केला होता. त्या वेळी बाजीप्रभू चौकातील ‘केडीएमटी’चा बस थांबा नेहरू रस्त्यावरील उद्यानासमोर हलविण्याचे आदेश दिले होते. एमआयडीसी निवासी, कल्याण, खोणी भागात जाणाऱ्या ज्या बसची वेळ असेल तीच बस फक्त बाजीप्रभू चौकात आणण्याचे ठरले होते. या दोन्ही चौकांमधील रिक्षाचालकांना चिमणी गल्लीतील पाटकर प्लाझामधील तळाच्या आणि पहिल्या मजल्यावरील वाहनतळावर जागा देण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र सेना बीजेपी यांच्यात जरी युती झाली असलीतरी अंतर्गत वाद हे तसेच आहेत. त्याच बरोबरीने विकासकामांबाबत श्रेयलाटणे यामध्ये दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा लागलेली असते याचा अनुभव नागरिकांनी अनेकवेळा घेतला आहे. परिणामी शहरात अनेक सुविधांपासून नागरिक वंचित राहतात. सर्वसामन्य जनता मात्र या राजकारणात होरपळली जात आहे.
(श्रुती देशपांडे-नानल, प्रतिनिधी )