केडीएमसीचे शिलकी अंदाजपत्रक प्रदीर्घ चर्चेअंती अखेर मंजूर
स्थायी समिती कडून १८६ कोटीची वाढीव तरतुद

कल्याण  : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे २०१९ – २०२० या आर्थिक वर्षासाठी स्थायी समितीने तयार केलेले २१२३ कोटी ९९ लाख जमा व २१२३ कोटी ८८ लाख खर्चासह १० लाख ५१ हजार शिलकी अंदाजपत्रकाला गुरुवारी पार पडलेल्या महासभेत दोन तासांच्या झालेल्या प्रदीर्घ चर्चेअंती त्याला मंजूरी मिळाली.

केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी महापालिकेचा २०१९- २० चे रक्कम १९३७ .९९ कोटी जमेचा व १९३७. ८८ कोटी खर्चा असलेला १०. ५१ लक्ष शिलकीचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. या अंदाजपत्रकावर स्थायी समिती सदस्यांनी चर्चा करून महसुली उत्पन्नात १८६ कोटी रूपयांची वाढ सुचविली आहे.स्था निक स्वराज्य संस्थांमध्ये वर्षाचे आर्थिक अंदाजपत्रक प्रशासनाकडून स्थायी समितीला, स्थायी समितीकडून जमाखर्चात वाढ-घट सुचवल्यानंतर हा अर्थसंकल्प महासभेकडे सादर केला जातो. महासभेतील चर्चेनंतर सर्व नगरसेवकांच्या संमतीने अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी दिली जाते. यामुळे वर्षाचे आर्थिक नियोजन करण्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात आपल्या प्रभागात किती विकासकामे होणार आहेत, याची उत्सुकता नगरसेवकांना लागलेली असते. शिवाय महासभेतील चर्चेदरम्यान आपल्या प्रभागातील विकासकामांसाठी निधी मिळावा, यासाठी नगरसेवकांकडून उपसूचना दिल्या जातात. मात्र या महासभेत सुरवातीपासूनच शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी चर्चा न करताच मंजूर असा घोषा लावला होता. मात्र विरोधी पक्षात असलेल्या मनसे पक्षाने मात्र आम्हाला अभ्यासाला वेळ द्या चर्चा करूयात असा अट्टाहास धरल्याने दोन तास हि चर्चा चालली. यामध्येही नेहमीचेच बोलणारे आणि ठराविक नगरसेवकांनीच प्रशासनाला काही उपसूचना केल्या. बाकीच्यांनी या चर्चेत काही उत्साहाने सहभाग घेतला नाही. अंदाजपत्रक सादर करताना स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी सांगितले की, महापालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधा देण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच रस्ते,पूल यांच्या बांधणीलाही विशेष मह्त्त्व देण्यात आले असल्याचे त्यांनी आपल्या मनोगता मध्ये सांगितले.
—————————————
अंदाजपत्रकातील ठळक बाबी
रस्ते पूल बांधणे व देखभाल दुरुस्तीसाठी २०९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
उद्याने तलाव बागा यांच्या देखभाल दुरुस्ती साठी १० कोटी २५लाख रुपयांची तरतूद केली आहे. डोंबिवली पश्चिम येथे फुलपाखरू उद्यानासाठी विशेष १ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शौचालये देखभाल दुरुस्ती साठी ६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच विविध ठिकाणी इ-टॉयलेट साठी ५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
पाणी पुरवठा वितरण तसेच जलकुंभ देखभाल दुरुस्ती अंतर्गत ८९. ४० कोटीची तरतुद केली आहे.
महापालिका हद्दीतील सर्व शाळां मध्ये सॅनिटरी नॅपकिन डिस्पेंसिंग वेंडिंग मशीन बसवणे. महिला व बालकल्याण विकासांतर्गत अनेक प्रकल्पांसाठी ७ कोटी ४७ लाखांची तरतूद केली आहे.
दिव्यांग मुलांसाठीं महापालिका प्रथमच शाळा उभारणार असल्याची माहिती सभापती म्हात्रे यांनी दिली.
परिवहन सेवेच्या सक्षमीकरणासाठी २१ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे.

****** (श्रुती देशपांडे -नानल, प्रतिनिधी) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!